लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चित्रपट, मालिका, वेब सिरीज या मध्ये भूमिका करण्यापूर्वी रंगमंचावर भूमिका कराव्यात. भूमिका कोणतीही असो ती समरसून करता आली पाहिजे व जगता आली पाहिजे. तरुण उदयोन्मुख कलाकारांनी कसदार अभिनय कसा असतो हे कळण्यासाठी जुनी नाटके आवर्जून पाहावीत असा सल्ला सुहासिनी देशपांडे यांनी नवोदितांना दिला.
निमित्त होते, सहारा प्रॉडक्शन हाऊस आणि मिडास टच इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेचे. यामध्ये अंजली जगताप यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर उमेश कुलकर्णी, ॠतू कुलकर्णी यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळविले. स्पर्धेत लता टाकळकर, अनुश्री सप्रे,भारती थोरात आणि प्रणाली कडकोळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण सोहळा लक्ष्मी रस्त्यावरील मलबार गोल्ड शोरूम च्या सभागृहात पार पडला. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि निवेदक संदीप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रदीप प्रभुणे, सहाराच्या रसिका भवाळकर, ग्राफिक डिझायनर वैशाली चिपलकट्टी, अभिजित जोशी मेमोरियल फाऊन्डेशन चे नीतू अरोरा आणि अथर्व जोशी यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणा-यांसाठी अभिनयाचे, रंगभूषा तसेच दिग्दर्शनाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा मानस सहारा च्या डॉ. राजेंन्द्र भवाळकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला. मिडास टच च्या डॉ. अंजली जोशी म्हणाल्या, गेली दीड वर्ष कोरोना महामारी मुळे सर्वत्र एक मरगळ आली आहे. कलेच्या माध्यमातून मनाला उभारी देण्याच्या उद्देशाने आम्ही एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले.