पिंपरी : पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करावी, त्याबाबत राजकीय हस्तक्षेप होणार नाही किंवा कोणीही तुम्हाला फोन करणार नाही, कोणाचा फोन आला तर सांगा, मी बघतो त्या फोनवाल्याला, अशा सूचना देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या सूचना पोलिसांना केल्या.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेनुसार शहर पोलीस दलासाठी हेल्थ ३६५ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील तीन हजारांवर पोलिसांना स्मार्ट वाॅचचे वाटप करण्यात आले. चिंचवड येथे शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप झाले. तसेच या वेळी पोलिसांना सायकल व ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले. महापाैर उषा ढोरे, मावळचे आमदार सुनील शेळके, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे या वेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, शहरात औद्योगिकीकरण, नागरिकरण होताना दुचाकी जाळणे, वाहनांच्या काचा फोडणे, अशा प्रकारचे गुन्हे वाढले. गुन्हेगारीचे साईड इफेक्ट वाढले. ते कमी नाही तर बंद झाले पाहिजे. गुंडांकडून सामान्यांना होणारा त्रास कमी झाला पाहिजे. महिला, तरुणी, सामान्य नागरिक तसेच व्यावसायिक, व्यापारी यांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे. शहरात गुन्हेगारीतून पैसे मिळवून काहिंनी प्रस्थ वाढविले आहे. त्यांना ताळ्यावर आणायचे आहे. कायद्याच्या व नियमांच्या अधीन राहून पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाई करावी.
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मिती करताना घाईगडबड झाली. पुरेशी साधनसामुग्री तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले नाही. पोलीस आयुक्तालयासाठी जागा, साधनसामुग्री तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल.
पोलिसांसाठीचा राज्यातील पहिलाच स्मार्ट उपक्रमस्मार्ट वाॅचमुळे आरोग्याची निगा राखण्याबाबत पोलिसांना मदत होणार आहे. राज्यातील पोलिसांसाठीचा हा पहिलाच स्मार्ट उपक्रम आहे. यामुळे पोलिसांचे जिवनही स्मार्ट होईल. यातून पोलीस दलाचे आरोग्य निश्चत सुधारेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
रात्रगस्तीसाठी सायकल, ग्रामसुरक्षा दलरात्रगस्तीसाठी पोलिसांना सायकलचे वाटप करण्यात आले. एका पोलीस ठाण्याला ३० अशा प्रकारे १८ पोलीस ठाण्यांना ५४० सायकल देण्यात आल्या. तसेच रात्र गस्तीसाठी ग्राम सुरक्षा दल नियुक्त केले असून त्याच्या सदस्यांनाही ओळखपत्र प्रदान करण्यात आले.