नितीन करमळकर : सनदी लेखापाल संस्थेत मिळणार प्रत्यक्ष कामाचा अनुभव
पुणे : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंस आॅफ इंडिया (आयसीएआय) यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार झाला असून, विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू असताना विविध औद्योगिक कंपन्या, सनदी लेखापाल संस्था यामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. तसेच वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, तसेच अर्थविषयक कौशल्य, रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी मिळणार आहेत, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.
पुणे विद्यापीठ व आयसीएआय यांच्यात झालेल्या शैक्षणिक सामंजस्य करारावर गुरूवारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि '''''''' आयसीएआय '''''''' चे उपाध्यक्ष सीए निहार जांबूसरिया यांनी स्वाक्ष-या केल्या. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर ‘आयसीएआय’ च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘एओएसएसजी’ चे अध्यक्ष डॉ. एस. बी. झावरे, ‘डब्ल्यूआयआरसी’ चे अध्यक्ष सीए ललित बजाज, ‘आयसीएआय’ पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा आदी उपस्थित होते.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, समाजात होणारी स्थित्यंतरे विद्यापीठातही होणे गरजेचे आहे. कोरोना काळात अनेक त्रुटींबद्दल विचार करायला वेळ मिळाला. सध्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या बरोबर करार करत आहोत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल आहे.
डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, विद्यापीठात सुमारे ४० टक्के विद्यार्थी वाणिज्य शाखेचे असून या करारामुळे विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढेल. प्लेसमेंटसाठी मदत होईल.
----------------------------