लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : चित्रपट, मालिकांच्या प्रभावामुळे लघुपट (शॉर्ट फिल्म) निर्मितीचे वेड शहरातील तरुणाईमध्ये दिसून येऊ लागले आहे. काही जण छंद म्हणून तर काही जण आवड जोपासायची म्हणून या मार्गाकडे वळले आहेत. सध्याचा काळ स्मार्ट फोन आणि आधुनिक साधनांचा सुकाळ आहे. छोट्या आकारातील व्हीडिओ शूटिंगचे हॅण्डी कॅम सहज खरेदी करता येतात. व्हीडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर बाजारात मिळतात. अथवा इंटरनेटवरून डाऊनलोड करून घेता येतात. सहज या गोष्टी उपलब्ध झाल्याने महाविद्यालयात शिकणाऱ्या युवक, युवती, आयटी अभियंते शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी तसेच फावल्या वेळात लघुपट बनविण्याच्या कामात व्यस्त असल्याचे पहावयास मिळू लागले आहे. सामाजिक आशय मांडणाऱ्या लघुपटांची चित्रपट महोत्सवात निवड होऊ शकते. त्याची दखल घेतली जाऊ शकते.आठ ते दहा दिवसांत तयार होणारे लघुपट सुमार दर्जाचे होत आहेत. केवळ लघुपट तयार करणारे निर्मातेच तयार होत आहेत असे नाही तर अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या तरुण, तरुणींची संख्याही वाढते आहे. आपल्या शहरातच लघुपटाची निर्मिती होत असल्याने शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणारे तरुण, तरुणी सुटीच्या दिवशी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. अनेक जणांना कॅमेरा हाताळण्याची संधी मिळते आहे. लघुपट तयार करणाऱ्या टीममध्ये बहुतांशी नवखे कलाकार असतात. प्रत्येक जण काही ना काही शिकण्यास मिळेल, या अपेक्षेने काम करतात. त्यामुळे कमी खर्चात लघुपट निर्मिती करणे शक्य होत आहे़ यासाठी अनेक तरुण मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहेत. त्यामुळे काहीजण कर्जबाजारीही झाले आहेत.
तरुणाईला लघुपट निर्मितीचे वेड
By admin | Published: May 13, 2017 4:34 AM