पुणे : यंदाच्या मान्सूनमध्ये खडकवासला धरण भरले म्हणून चार ते पाचवेळा मुठा नदीच्या पात्रात पाणी साेडण्यात आले. पुण्यात पुरेसा पाऊस पडलेला असताना आता नागरिकांवर पाणी कपातीची टांगती तलवार कशासाठी असा सवाल करत पुण्यातील तरुण पुणे महानगरपालिकेच्या इमारतीसमाेर गेल्या पाच दिवसांपासून उपाेषणाला बसला हाेता. शेवटी पालिकेचे आयुक्त साैरभ राव यांनी त्याच्या मागण्यांचे निवेदन स्विकारल्याने त्याने पुकारलेले आमरण उपाेषण मागे घेण्यात आले.
सध्या पुण्याच्या पाण्यावरुन राजकारण रंगताना दिसत आहे. शहरातील प्रत्येक व्यक्तीला 155 लिटर पाणी देण्यात येईल असा निर्णय पाठबंधारे खात्याकडून देण्यात आला आहे. सध्या शहरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा तर काही भागात टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. परंतु शहरातील धरणांमध्ये पुरेसा पाऊस पडला हाेता. तसेच पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण भरल्याने मुठा नदीत चार ते पाच वेळा पाणी साेडण्यात आले. याचा अर्थ पालिकेकडून पाण्याचे याेग्य नियाेजन करण्यात आले नाही असा आराेप करत पुणेकरांवर लादण्यात आलेली पाणी कपात रद्द करावी अशी मागणी करत ताैसिफ शेख हा तरुण आमरण उपाेषणाला बसला हाेता. गिरीश बापट यांनी त्याची भेट घेत पाणी कपात का गरजेची आहे हे सांगितले. तसेच पालिका आयुक्त साैरव राव यांनी अखेर पाच दिवसांनंतर त्याची भेट घेऊन निवेदन स्विकारले. तसेच उपाेषण मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार ताैसिफ शेख या तरुणाने उपाेषण मागे घेतले.