पुणे : शरीराची चुकीची ढब, अतिकष्टांमुळे येणारा थकवा किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे जडलेली पाठदुखी म्हणून बरेचदा दुर्लक्षित राहून जाणारे दुखणे हे प्रत्यक्षात शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीच्या अनिर्बंध वागण्यामुळे उद्भवणारी एक स्थिती म्हणजे ऍनकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) असू शकते, जी अवघ्या विशी आणि तिशीत गाठू शकते व कायमच्या अपंगत्वास कारणीभूत ठरू शकते असा इशारा प्रसिद्ध संधिवात तज्ज्ञ (Rheumatologist) डॉ. प्रवीण पाटील यांनी दिला आहे.
ऍनकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) हा मणक्याच्या संधीवातातील एक प्रकार आहे. जो १५ ते ४० वयोगटाच्या आतील तरुणांना होतो. डॉ. पाटील यांनी पुण्यातील या वयोगटातील १०० रुग्णांची पाहणी केली. त्यामध्ये एएसच्या जवळ-जवळ ७० टक्के रुग्णांमध्ये आजाराच्या सुरुवातीच्या ३ वर्षांमध्ये किंवा त्याहून अधिक काळ आजाराचे योग्य निदान होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. संधिवात तज्ञांपर्यंत पोहोचण्यापूर्वी व योग्य निदान होण्याआधी १६ टक्के रुग्णांना चार पाच डॉक्टरांना दाखवावे लागले तर काही रुग्णांनी दोन ते तीन तज्ज्ञ गाठले असल्याचे दिसून आले. याविषयी ' लोकमत' शी बोलताना संधीवाततज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील म्हणाले, शंभरातील जवळ-जवळ एक व्यक्ती मणक्याच्या इन्फ्लेमेटरी आर्थ्ररायटीसने ग्रस्त आहे. या स्थितीमध्ये मणक्याची हाडे एकमेकांशी जोडली जातात व मणका ताठर होतो. यामुळे पाठीला कायमचा पोक येतो. साधारणपणे १४-२० वर्षे वयोगटामध्ये जडणारा व पुरुषांच्या उत्पादक वर्षांची मोठी हानी करणारा हा आजार घरगुती उपचार करून किंवा दुकानात मिळणारी औषधे घेऊन बरा करण्याचा प्रयत्न रुग्णांकडून बरेचदा केला जातो. या आजारात सायटिका वगैरेसारखे चुकीचे निदान देखील केली जाते. निदान आणि उपचारांना उशीर झाल्यामुळे उत्पादकता कमी होणे, कामावरील गैरहजेरी वाढत असल्याचे व त्यामुळे ८ टक्के तरुणांना नोकरीही गमवावी लागल्याचे दिसले. ......ऍनकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) लक्षणे* तीन महिन्यापेक्षा अधिक काळ कंबरदुखी आणि आखडणे* आराम केल्यावर त्रास होतो रात्री आणि सकाळी वेदना होणे * एका जागी बसल्यावर त्रास होणे