लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लग्न झाल्यापासून वेगळे राहण्यासाठी आणि बाहेर नोकरी करण्यासाठी पत्नी आणि सासूकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर या तरुणाने व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
रोहित सुनील पवार (रा. माई हाईटस, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना १० ऑगस्ट २०२१ रोजी घडली होती.
याप्रकरणी सुनील रघुनाथ पवार (वय ५८, रा. माई हाईटस, लोणी स्टेशन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रोहित पवार याची पत्नी रश्मी रोहित पवार (वय २६) आणि सासू लता राजेश चव्हाण (वय ४६, दोघी रा. रामटेकडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि रश्मी यांचा २० नोव्हेंबर २०१६ रोजी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून वेगळे राहण्याच्या कारणावरून रश्मी रोहितशी भांडणे करत होती. तसेच बाहेर नोकरी करायची आहे, म्हणून व घरातील कोणाशीच बोलायचे नाही, या कारणावरून पत्नी व सासू यांनी त्याला शिवीगाळ करून सतत भांडणे करून त्याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून रोहित याने १० ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन ठेवला होता. त्यामध्ये ‘‘मी माझे जिवाचे बरे-वाईट करीत असून त्यात जबाबदार माझी पत्नी व सासू आहे,’’ असे त्यात म्हटले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ आढळून आल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेंडगे अधिक तपास करीत आहेत.