पुणे : वडील व इतर नातेवाईक कोणाला भेटू नये, तसेच घरच्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करू नये अशा विविध कारणांवरून पत्नी व सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून एका तरुणाने कुर्ला येथे रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.
सतीश शिवलिंग घोडके (वय ३२, रा. धानोरी, मूळ नांदेड) असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, सतीश याचे वडील शिवलिंग घोडके (६०, रा. बळवंतनगर नायगाव, जि. नांदेड) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पत्नी शुभांगी सतीश घोडके (२६), मेहुणा विजय गणपतराव मालीपाटील ( ३२), सासू जयश्री गणपतराव मालीपाटील (५२), सासरे गणपतराव मालीपाटील (५७) यांच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २०१६ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पुणे, नांदेड व कुर्ला रेल्वेस्टेशन येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा सतीश याचा २०१६ मध्ये शुभांगी हिच्यासोबत विवाह झाल्यापासून एकत्र राहत होते. सध्या सतीश हा खासगी नोकरीच्या निमित्ताने पुण्यातील धानोरी परिसरात वास्तव्यास होता. पत्नी व सासरची मंडळी सतीशच्या चारित्र्यावर संशय घेत होती तसेच त्याला गावी नांदेड येथे न राहू देता पुण्यात नोकरी करून राहण्यास सांगत होते. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून सतीश हा धानोरी येथील राहत्या घरातून कुर्ला मुंबई येथे निघून गेला होता. २७ फेब्रुवारीला त्याने कुर्ला रेल्वे स्थानक येथे रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. याबाबत सुरुवातीला कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील करीत आहेत.