पुणे : वर्क फ्रॉम होम जॉब देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार केसनंद परिसरात घडला आहे. हा प्रकार ३० एप्रिल २०२३ ते १६ मे २०२३ यादरम्यान घडला आहे. राजेंद्र राजू पाटील (वय २९, रा. केसनंद) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला आणि वर्क फ्रॉम होम करून पैसे कमवता येईल असे सांगितले. पाटील यांनी सहमती दर्शवल्यानंतर एका टेलिग्राम ग्रुप मध्ये तक्रारदार यांचा मोबाईल क्रमांक समाविष्ट करून त्यांना इतरांना कशाप्रकारे लाभ मिळत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.
त्यानुसार व्हाट्सअप व टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क करून विश्वास संपादन करून फॉलो आणि लाईकचा टास्क तसेच ट्रेडिंग टास्क देऊन पूर्ण करायला लावले. तसेच ते प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्कच्या नावाखाली वेगवेगळे चार्जेस सांगून १६ लाख ७८ हजार रुपये विविध बँक खात्यावर भरण्यास सांगितले. मात्र, सदर पैसे भरल्यानंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक एस कोळपे पुढील तपास करत आहे.