जुन्नर :न्यायालय हे न्यायमंदिर आहे. तेथे पावित्र्य राखणे सर्वांची जबाबदारी असते, अशी भावना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी जुन्नर येथे न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात केली होती. याच अनुषंगाने जुन्नर न्यायालयाच्या विस्तारित नवीन इमारतीत कायम स्वच्छता राहावी, गैरवर्तन करणारे, अस्वच्छता करणारे यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. नुकतेच या इमारतीत थुंकणाऱ्या एका युवकाला शिक्षा म्हणून पूर्ण खोलीतील फरशी पुसायला लावून स्वच्छता करण्याची शिक्षा करण्यात आली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नव्याने बांधण्यात आलेली जुन्नर न्यायालयाची इमारत आकर्षण बनली आहे. दर्जेदार बांधकाम, न्यायालयीन प्रशासनासाठी आवश्यक सुविधा, अधिकारी, कर्मचारी, वकील, पक्षकार, नागरिक यांच्यासाठी सर्व सुविधा या इमारतीत आहेत. शासकीय कार्यालयात बऱ्याच वेळेला अस्वच्छता आढळते. हे चित्र मात्र नवीन इमारतीत दिसू नये यासंदर्भात न्यायालय प्रशासन दक्ष आहे.
यासाठी नागरिकांची साथ हवी असते. परंतु घरात स्वच्छता व सार्वजनिक ठिकाणी अस्वस्थता अशी बऱ्याच वेळेला मानसिकता असते. नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारातच नागरिकांनी आतमध्ये येताना जवळील पान, तंबाखू, गुटखा, तत्सम पदार्थ बाहेरील बॉक्समध्ये काढून ठेवूनच आतमध्ये प्रवेश करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय सहन्यायाधीश इमारतीत फिरून बारकाईने पहाणी करत आहेत. अस्वच्छता करणारा आढळल्यास जागेवरच पोलिसांकरवी कारवाई केली जात आहे तसेच आर्थिक दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे. प्रवेशद्वार बंद करून आतमध्ये असलेल्या कर्मचारी, नागरिक सर्वांचीच झडती घेण्यात यावी म्हणजे स्वयंशिस्त राहील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.