सध्या पुरंदर तालुक्यात उन्हाळ्याच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका वन विभागातील प्राण्यांना बसतो. तुकाई मंदिर परिसरातील वन विभागामध्ये हरण, लांडगा, कोल्हा, तरस, ससा, त्याचप्रमाणे इतर लहान-मोठे सरपटणारे प्राणी आहेत. उन्हाळ्यात वन विभागातील पाणीसाठा संपल्यानंतर हे प्राणी पाणी पिण्यासाठी धोका पत्करुन मानवी वस्तीकडे धाव घेतात. तुकाई मंदिर परिसराजवळून जेजुरी ते उरुळीकांचन कडे जाणारा महामार्ग असल्यामुळे अनेक वेळा रस्ता ओलांडताना अपघात होतात व वन्य प्राण्यांचा बळी जातो. त्यामुळे जीवसृष्टी धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण होत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन शरद चंद्रजी पतसंस्थेचे चेअरमन सुनील कुंजीर व त्यांचे सर्व सहकारी यांनी आठवड्यातून एक दिवस या वनविभागातील पाणीसाठे पाण्याने भरण्याचे ठरविले. त्यानंतर टॅकरच्या साह्याने पाणी आणुन पानवठ्यामध्ये भरत आहेत. या कामात महादेव कुंजीर, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे कार्याध्यक्ष विजय कुंजीर, उद्योगपती कैलास तात्या कुंजीर, रमेश कुंजीर, सागर कुंजीर नेहमीच मदत करतात.
--
वाघापूर परिसरामध्ये वनविभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून या ठिकाणी असणाऱ्या वन्यजीवनामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. म्हणून वन्यजीवांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने या कार्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे.
- सुनील कुंजीर,
सामाजिक कार्यकर्ते
--
२७भुलेश्वर वन्यजीव पाणीपुरवठा
फोटो ओळ - तुकाई मंदिर परिसरातील पानवठे भरताना सुनील कुंजीर, महादेव कुंजीर,विजय कुंजीर आदी