लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जागेच्या वादातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून गंभीररीत्या जखमी केले. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री ७.३०च्या सुमारास लोहगावमधील खांदवेनगरमध्ये घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चौघांना अटक केली.
प्रसाद कृष्णा देवकर (वय २९), संतोष साधू खांदवे (वय २६), साधू दामाजी खांदवे (वय ५०) आणि राजेंद्र दत्तात्रय खांदवे (वय ४५, सर्व रा. खांदवेनगर, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिजित शेजवळ (वय २७) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी अभिजित खांदवेनगरमध्ये थांबले होते. त्या वेळी संतोष खांदवेने त्यांना शिवीगाळ करीत आमच्या हद्दीत का आला, तुला लय मस्ती आलीय का, थांब, तुला बघतो, असे म्हणत साथीदारांना बोलाविले. आज तुझा कार्यक्रमच करतो, असे म्हणत आरोपींनी अभिजितला मारहाण करून फरफटत नेले. त्यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीररीत्या जखमी केले. त्यानंतर आरोपींनी अभिजितच्या आईलाही शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. ए. जाधव तपास करीत आहेत.