कळंब, चास, लौकी, महाळुंगे पडवळ नारोडी या परिसरात मागील दोन वर्षांपासून बिबट्याचे मानवीवस्तीवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. चास व नारोडी परिसरात मागील दोन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत.मध्यंतरी बिबट्याचा उपद्रव काहीसा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा हल्ले सुरू झाले आहेत.आज बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पांडू बाळू केवाळे (वय २०) हा तरुण आपल्या मोटरसायकल वरून बाजरीचे राखण करण्यासाठी शेतात गेला होता.शेतातील बाजरीचे राखण करत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. केवाळे याने मदतीसाठी आरडाओरडा केला.मात्र या परिसरात कोणीच राहत नसल्याने त्याला कोणाचीही मदत मिळाली नाही.त्याने बिबट्याच्या हल्ल्याला न डगमगता स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. बिबट्याच्या हल्ल्यात केवाळे याच्या डाव्या पायाला बिबट्याच्या नख्या लागल्या आहेत.जखमी अवस्थेतही पांडू केवाळे याने घराकडे धाव घेतली. कुटुंब व परिसरातील नागरिकांना झालेला प्रकार सांगितला.नितीन चासकर यांनी केवाळे यांना मंचर येथे उपचारासाठी आणले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.कडेवाडी, राजेवाडी, खटकाळी या परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून बिबट्याकडून वारंवार शेतकऱ्यांची पाळीव कुत्री तसेच जनावरांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहे. याच परिसरात चार वर्षापूर्वी बिबट्याने हल्ला करून ज्येष्ठ महिलेला जखमी केले होते. वनखात्याने या परिसरात तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी उपसरपंच श्रीकांत चासकर यांनी केली आहे.
तरुणावर बिबट्याने केला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:10 AM