पुणे : जेएनपीटी येथून कस्टमचा माल आणून त्याची विक्री करण्याच्या व्यवसायात गुंतविलेल्या ३० लाख रुपयांचा मोबदला मागितल्याने चिडून मित्राच्या गळ्यावर वार करुन त्याचा खुन करणार्या प्रयत्न केल्याची घटना हडपसर येथील रवीदर्शनमधील रस्त्यावर भरदिवसा घडली.
हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन सचिन दिलीप होले (वय ३४, रा. ससाणेनगर, हडपसर) याला अटक केली आहे. याप्रकरणी शादाब अमानुल्ला शेख (वय ३६, रा. सय्यदनगर, महम्मदवाडी रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार हडपसरमधील रवीदर्शन सिग्नल ते एम कॉलेजकडे जाणार्या रस्त्यावर शनिवारी सकाळी पावणेअकरा वाजता घडला.
शादाब शेख आणि सचिन होले हे दोघे मित्र आहेत. होले याने शेख व त्यांच्या मित्रांना आपण जेएनपीटी कस्टम येथून माल घेऊन त्यांची विक्री करु. जो काही नफा होईल, ते सगळे मिळून वाटून घेऊ, असे सांगितले. त्याने शेख व त्यांच्या मित्रांकडून २९ लाख ९० हजार रुपये घेतले. मात्र, त्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. तेव्हा शेख यांनी होले यांच्याकडे त्यांनी गुंतविलेले पैसे परत मागितले.
तेव्हा होले याने त्यांना मेसेज करुन सय्यदनगर रेल्वेगेटजवळ शनिवारी सकाळी बोलविले. त्यानुसार शेख हे तेथे सकाळी पावणेअकरा वाजता गेले. तेथून त्यांना रवीदर्शन येथे नेऊन त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर तपास करीत आहेत.