पिंपरी : भांडणात समजूत काढणाऱ्या तरुणाला दगडाने व कोयत्याने वार करून मारहाण केली. तसेच टोळक्याने आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. काळेवाडी फाटा येथील पुलाखाली गुरुवारी (दि. १८) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.
किरण उत्तम लोंढे (वय २६, रा. काळेवाडी) यांनी या प्रकरणी शुक्रवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक मुकुंद मोरे (वय १८ रा. बिड), अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चेतन साळवी, तसेच आरोपी अशोक मोरे याचे इतर दोन साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोंढे यांचा ट्रॅव्हल्स बसचा व्यवसाय आहे. त्यांच्या बसवर काम करणारा ज्ञानेश्वर सगर हा प्रवाशांना बसमध्ये बसवत असताना आरोपी चेतन साळवी हा दरवाजा मध्ये उभा राहिला होता. ज्ञानेश्वर सगर याने त्याला दरवाज्यातून बाजूला उभे राहण्यास सांगितले. चेतन याला त्याचा राग आला. त्यातून त्याने ज्ञानेश्वर याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यामुळे फिर्यादी लोंढे हे चैतन्याची समजूत काढत होते. त्यावेळी आरोपी चैतन याने त्याच्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कोयते हातात घेऊन फिर्यादीच्या जवळ येऊन रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या पायावर मारला. तसेच कोयत्याने वार केल्याने फिर्यादी लोंढे जखमी झाले. तसेच आरोपींनी लोंढे यांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्यावर पडलेले दगड उचलून फिर्यादीचा मावस भाऊ सचिन पावडे याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरडाओरडा करून दहशत निर्माण करून आरोपी दुचाकीवरून निघून गेले.