लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : कोंढवळ येथील चौंढीच्या धबधब्यात पडलेला तरुणाचा चौथ्या दिवशीही सापडला नाही. एनडीआरएफच्या सतरा जवानांनी कसोशीने तपास केला व त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाने सर्वतोपरी मदत केली. मात्र, तो न सापडल्याने रविवारी शोधकार्य थांबविण्यात आले.
शिक्रापूर येथील लक्ष्मण सोन्याबापू लहारे हा तरुण आपल्या तीन मित्र व दोन लहान मुलांसोबत भीमाशंकर येथे कोंढवळ येथील चौंढीच्या धबधब्याकडे वर्षाविहारासाठी आले होते. मात्र, मुख्य धबधब्याजवळील पाण्याजवळ लक्ष्मण सोन्याबापू लहारे हा गेला असता, त्याचा पाय घसरून तो धबधब्यात पडून बेपत्ता झाला. पहिने दोन दिवस ग्रामस्थ व पोलिसांनी शोध घेतला. तर शनिवारी (दि.१९) व रविवार (दि.२०) एनडीआरएफच्या १७ जवानांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा शोध लागू शकला नाही. सततच्या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे धबधब्याला असलेल्या पाण्यामुळे तपास करण्यास अनेक अडथळे येत होते. तरी एनडीआरएफच्या जवानांनी दोन दिवस तपासकार्य सुरू ठेवले. आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी, सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे, सहायक फौजदार जिजाराम वाजे, पोलीस नाईक दीपक काशिद, शरद कुलवडे, पोलीस पाटील सुभाष कारोटे हे घटनास्थळी थांबून सर्वतोपरी मदत करत होते. स्थानिक ग्रामस्थांनी शोध कार्यात भरपूर मदत केली.
एनडीआरएफच्या जवानांनी सलग दोन दिवस तपास करून रविवारी दुपारी तपास कार्य थांबवले आहे. पाऊस व पाणी कमी झाल्यावर त्याचा तपास लागेल, असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तविला आहे.
चौकट
लक्ष्मण सोन्याबापू लहारे हा तरुण (राहुरी, जि. अहमदनगर) येथील आहे. आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी शिक्रापूर येथील कंपनीमध्ये तो काम करत होता. काही वर्षांपूर्वी आईवडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबामध्ये दोनच भाऊ राहिले होते. दीड वर्षापूर्वी लक्ष्मणचे लग्न झाले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आपल्या कुटुंबाचे व लहान भावाचे शिक्षण व त्याचा संभाळ करण्यासाठी लक्ष्मण हा कंपनीमध्ये काम करत होता. आपल्या थोरल्या भावाबाबत झालेल्या घटनेमुळे लहान असणारा राम लहारे हादरून गेला असून अचानक धक्का बसल्यामुळे त्यास रुग्णालयात दाखल केले असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले.
फोटो : कोंढवळ येथील चौंढीच्या धबधब्यामध्ये बेपत्ता झालेल्या तरुणाचा चौथ्याही दिवशी तपास करताना एनडीआरएफचे जवान.