सांगवी : पंढरपूरला मुळ गावी निघालोय संध्याकाळी परत येतोय म्हणून घरी फोनवर सांगून सकाळी निघालेल्या एका ३४ वर्षीय तरुणाने बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी हद्दीत दोरीच्या साह्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिली. ही घटना शनिवारी (दि.९) रोजी पाहुणेवाडी गावच्या हद्दीत इरीकेशन २२ फाटा येथील कॅनॉलच्या कडेला घडून आली.
समाधान पांडुरंग पवार (वय ३४) सध्या रा.जामदार रोड,बारामती,(ता.बारामती),मुळगाव धोडेवाडी,जैनवाडी (ता. पंढरपूर, जि.सोलापुर ) असे आत्महत्या केलेल्या मृत व्यक्तीचे नाव असून आत्महत्याचे नेमके कारण समजले नाही. याबाबत ज्योतीराम ज्ञानोबा पवार (वय २६) रा. बारामती (ता.बारामती जि.पुणे) मुळगाव धोडेवाडी,जैनवाडी (ता. पंढरपूर, जि.सोलापुर ) यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनला खबर दिली आहे.
समाधान पवार हे बारामती येथील एका खासगी शॉप मध्ये ऑडिट सुपरवायझर म्हणून नोकरी करत होते. शनिवारी पवार यांना त्यांचे चुलत भाऊ ज्योतीराम पवार व पत्नी रुपाली यांनी फोन केला असता आपल्या मुळगावी धोडेवाडी,( ता. पंढरपुर) येथे निघालो असून संध्याकाळी परत येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ते उशिरा पर्यंत परतले नाही. म्ह्णून पत्नी रुपाली यांनी दिर ज्योतीराम पवार यांना पवार आले नसल्याचे फोनवरून कळवले. त्यानंतर समाधान पवार यांना फोन केला असता उचलला नाही. रात्री वेळोवेळी फोन लावण्यात आले. मुळ गावी धोडेवाडी येथे फोन केल्यावर त्यांनी सांगितले की समाधान गावी आला नाही. त्यानंतर सर्व नातेवाईक सकाळी शोधाशोध व फोन करू लागले असता बंद लागत होता. त्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशन येथे मिसींग तक्रार नोंदविली होती.
त्यांनतर रविवारी शोध घेत असताना दुपारी दिड वाजण्याच्या दरम्यान समाधानला फोन करीत असताना फिर्यादीचा चुलत भाऊ अमोल पांडुरंग पवार यांच्या फोनवरुन समाधान पवार यांना फोन लागला. त्यावेळी फोनवर पोलीस बोलत होते. पोलिसांनी नातेवाईकांना सर्व हकीकत सांगून ओळख पटविण्यात आली.
माळेगाव पोलिसांमुळे मृताच्या नातेवाईकांचा शोध......
समाधान पवारने केलेल्या आत्महत्याच्या दुसऱ्या दिवशी काही नागरिकांनी माळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना माहिती दिली असता त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. दरम्यान समाधानकडे असणारा फोन बंद होऊन त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्रे नसल्याने ओळख पटत नव्हती. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक घुगे यांनी समाधानच्या फोन मधील सीम कार्ड आपल्या फोनमध्ये टाकले असता नातेवाईकांचे फोन येण्यास सुरूवात झाली. यावेळी कोणाचा फोन आहे असे पोलिसांनी विचारले असता त्याचे नाव समाधान पवार असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी झालेल्या घटने बद्दल नातेवाईकांना माहिती दिली. यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटली गेली.त्यानंतर मृतदेह रुई ग्रामीण रुग्णालयात नेऊन तपासणी नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.