केडगाव : जागतिक मैत्रीदिनाच्या दिवशी गावकरी, नातेवाईक व मित्रांसाठी आखाड पार्टीचे नियोजन करणाऱ्या स्वप्निल ऊर्फ पिंटू ज्ञानदेव शेलार (वय ३०, रा. देलवडी, ता. दौंड) याचा दगडाने ठेचून व धारदार शस्त्राने वार करून निर्र्घृण खून करण्यात आला. वाळू ठेकेदारी व गुंडगिरीच्या वादातून ही घटना घडल्याचे समजते. देलवडी परिसर भयभीत झाला आहे. परिसराला छावणीचे स्वरूप आले असून परिसरात पोलीस, शीघ्र कृती दल हजर झाले आहे. दरम्यान यवत पोलिसांनी यातील ५ आरोपींना अटक केली आहे.ही घटना रविवारी (दि. ५) दौंड तालुक्यातील देलवडी येथे एकेरीवाडी-देलवडी रस्त्यावर नारायण शेलार यांच्या घरासमोर घडली. घटनास्थळावर पोलिसांना एक गावठी कट्टा सापडला आहे. हा कट्टा कोणी वापरला? याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र गोळीबार झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.याबाबत स्वप्निल याचा भाऊ विशाल ज्ञानदेव शेलार (वय २८) याने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीनुसार स्वप्निल गेल्या अनेक दिवसांपासून वाळू व्यवसाय करीत होता. त्याने अहमदनगर जिल्ह्यातील राजापूर येथील वाळूचा ठेका काही दिवसांपूर्वी घेतला होता. तो ठेका दोन-चार दिवसांत बंद पडला. तसेच भीमा नदीपात्रात वाळूउपसा करण्याच्या कारणावरून त्याचे व परिसरातील काही वाळू ठेकेदारांचे वाद झाले होते. त्याला जीवे मारण्याच्या धमक्यादेखील देण्यात आल्या होत्या.फिर्यादी विशाल शेलार याने संतोष संपत जगताप, समीर संपत जगताप (दोघे रा. राहू, ता. दौंड), बाबू मेमाणे, रणजित वांझरे, सोमनाथ विष्णुपंत शेलार (तिघे रा. देलवडी, ता. दौंड), अनिल मोहिते (रा. पिंपरी-चिंचवड), दीपक दंडवते (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी खून केल्याचा संशयावरून पाच जणांना अटक केली आहे.रविवारी स्वप्निल रात्री ९ च्या सुमारास तो घरापासून २०० मीटर अंतरावरील एकेरीवाडी-देलवडी रस्त्यावर मित्र बसले आहेत. त्यांना जेवणाचा डबा घेऊन चाललो असल्याचे भावाला सांगितले. अर्ध्या तासातच रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात स्वप्निल याचा मृतदेह पडला असल्याची खबर मिळाली. स्वप्निलचा खून डोक्यात मोठा दगड घालून करण्यात आला आहे. तसेच धारदार शस्त्राने वार करून हात तोडले आहेत. मृतदेहाचा चेहरा विद्रूप असून ठेचलेला आहे.
वाळू व्यवसायातून देलवडीला युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:26 AM