पुणे : ‘फ्रेंडशिप डे’ म्हणजे युवावर्गाचा खास हक्काचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा दिवस! मैत्री हे असं एकच नातं आहे, जे आपल्याला ठरवण्याचा आणि निवडण्याचा हक्क असतो. या नात्याच्या सेलिब्रेशन करण्याचा दिवस म्हणजे ‘फ्रेंडशिप डे’! शहरातील तरुणांची वर्दळ असणारे एफसी रोड, जंगलीमहाराज रोड, एम. जी. रोड गर्दीने फुलले होते. याबरोबरच शहरातील मॉल्समध्ये आणि हॉटेल्समध्येही तरुणांनी गर्दी केली होती. हा डे सेलिब्रेट करण्यासाठी आज अवघी बाजारपेठ नटली होती. जागोजागी, गल्लोगल्ली बाजारपेठांमध्ये फ्रेंडशिप बँड तरुणांना खुणावत होते. मागील दहा-पंधरा वर्षांमध्ये ‘फ्रेंडशिप डे’चं महत्त्व कैक पटींनी वाढलं आहे. या ‘फ्रेंडशिप डे’मध्ये आता सोशल मीडियाही डोकावू लागला आहे. त्यामुळे अगदीच खराखुरा बँड न बांधणारे आपल्या दोस्तांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. हा दिवस साजरा करण्याला वयाचं कोणतेही बंधन मानले जात नाही. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आकर्षित करता येईल, अशा प्रकारची व्हरायटी बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात तरुणींकडून ब्रेसलेट स्वरूपातील बँडला तर तरुणांकडून घड्याळ स्वरूपातील बँडला जास्त मागणी आहे. अशा प्रकारचे बँड कायमस्वरूपी वापरता येतात. यामध्ये रंगांचे वैविध्यही खास आहे. याबरोबरच आपल्या जवळच्या मित्राला या स्पेशल दिवशी खूष करण्यासाठी गिफ्टची दुकानेही सजली आहेत. यात आपल्या सख्याला आवडेल अशी किंवा उपयोगी पडेल आणि कायम आठवणीत राहील अशा अनेक वस्तूंची रेलचेल आहे. मैत्री दिनाचा संदेश देणारी विविध प्रकारची आकर्षक स्वरूपातील शुभेच्छा कार्डही बाजारात मोठ्या प्रमाणात होती. इतकेच नाही तर आपल्याला पाहिजे तसे चित्र काढलेले शुभेच्छा कार्ड आपल्यासमोर बनवून देणारे किंवा मित्राचा फोटो देऊन आपल्यासमोर त्याचे स्केच बनविणारे आर्टिस्टही एफसी रोडवर होते. अशाप्रकारे मैत्री दिनाच्या दिवशी आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला विशेष गिफ्ट देत अनेकांनी खूष केले. मैत्रीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पिवळ्या गुलाबालाही शहरात मोठ्या प्रमाणात मागणी होती.
तरुणाईने जपले मैत्रीचे बंध
By admin | Published: August 03, 2015 4:01 AM