पुणे : खडकवासला धरणातून सकाळी माेठ्याप्रमाणावर पाणी साेडण्यात आल्याने भिडेपूल दुपारी 11 च्या सुमारास पाण्याखाली गेला. दुपारी एक नंतर पाण्याचा जाेर काहीसा ओसरल्यानंतर भिडे पुलावरील पाणी कमी झाले. त्यानंतर भिडे पुलावरील पाण्यात तरुणाई थिल्लरपणा करताना आढळून आली. पुलावरुन पाणी वाहत असताना तरुण आपली वाहने पुलावर आणून त्यात स्टंटबाजी करताना आढळून आले.
आठवडाभरापासून शहरात हाेत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे आज सकाळी 10 वाजता तब्बल 13 हजाराहून अधिक क्सुसेसने पाणी मुठा नदीपात्रात साेडण्यात आले. त्यातच सकाळपासून शहरात पावसाच्या जाेरदार सरी काेसळत हाेत्या. खडकवासला धरणातून पाणी साेडण्यात आल्याने भिडेपूल पाण्याखाली गेला. खबदारीचा उपाय म्हणून पाेलिसांकडून दाेन्ही बाजूची वाहतूक बॅरिगेट टाकून थांबविण्यात आली हाेती. दुपारनंतर पावसाचा जाेर ओसरल्याने पुलावरील पाणी काहीसे कमी झाले. या कमी झालेल्या पाण्यामध्ये तरुणाई थिल्लरपणा करत असल्याचे दिसून आली.
भिडे पुलावर काहीसे पाणी असताना तरुण आपल्या दुचाकी पुलावर घेऊन येत स्टंट करत हाेते. त्याचबराेबर पुलावरील पाण्यात तरुण- तरुणी सेल्फी घेत असल्याचे आढळून आले. अनेकजण पुलाच्या कठड्याला थांबून पाण्यात वाकून पाहत हाेते. काेणी पाण्यात पडले असते तर जीव जाण्याची शक्यता हाेती. आश्चर्य म्हणजे तरुणाईचा थिल्लरपणा सुरु असताना त्याठिकाणी एकही पाेलीस नव्हता.