भीमाशंकर अभयारण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरवर्षी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धबधबे वाहत असतात. पावसाळा सुरू झाला की येथे पर्यटक व निसर्गप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामध्ये कोंढवळ येथील चौंडीचा धबधबा हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. लक्ष्मण पण हा धबधबा पाहण्यासाठी त्याच्या मित्रांबरोबर आला होता. मात्र, पाय घसरून तो गुरूवारी बेपत्ता झाला होता. पोलिसांनी दोन दिवस शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. गुरुवारपासून या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे धबधब्याचा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. यामुळे शोधकार्यात अडथळे आले. शनिवारी सकाळी ९.३० वाजता एनडीआरएफच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. दिवस भर धबधब्याच्या मुख्य घळई व तिसऱ्या घळईमध्ये शोध घेतला असता लक्ष्मण सापडला नाही. निसर्ग परिचय केंद्राचे धनंजय कोकणे व ग्रामस्थांनी धबधब्यापुढील चार ते पाच कि.मी. जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सापडला नाही. सायंकाळी अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली आहे. रविवारी हे पथक शोध मोहीम सुरू ठेवणार आहे, असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक विवेक पाटील यांनी सांगितले.
फोटो : चौंढीच्या धबधब्यामध्ये पडलेल्या युवकाचा शोध घेताना एनडीआरएफचे जवान