पुणे : तरुणाईमध्ये हुक्क्याची वाढणारी क्रेझ, ग्लॅमरच्या दुनियेचे वाढते आकर्षण आणि त्यातून वाढणारी व्यसनाधीनता यांचे दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे तरुणाईने ग्लॅमरस दुनियेपासून सावध राहून इतरांमध्येही जनजागृती करावी, असा सूर चर्चासत्रात उमटला.
जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोध दिनाचे औचित्य साधून आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आणि मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयाच्या वतीने हे चर्चासत्र घेण्यात आले. यात मानसिक ताणातून वाढणारी व्यसनाधीनता, तरुणांची जागरुकता आणि समुपदेशनावर विद्यार्थी, मान्यवर आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
या वेळी अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगरे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, गणेश गावडे, किशन पारीख, प्रमोद शेळके, विशाल शिंदे, केतन जैन, संतोष पटवर्धन उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक चव्हाण म्हणाले, तुमच्या आजूबाजूला व्यसनांचा विळखा वाढत असला तरी तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही सावध राहून पोलिसांकडे अथवा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तक्रार केल्यास त्यावर जलदगतीने कारवाई केली जाईल.
डॉ. दुधाणे म्हणाले, व्यसन हा आजार आहे. त्यावर वेळीच उपचार केले तर तुम्ही नक्कीच त्यातून बाहेर पडू शकता. वाढत्या मानसिक तणावामुळेदेखील तरुण व्यसनांकडे वळतात. तरुणाई हा देशाचा कणा आहे आणि या तरुणाईला व्यसनाची झालर नको असेल तर वेळीच सावध व्हावे.