पुणे : सहा महिन्यापूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगातील पोर्शे कारने धडक दिल्याने अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेला सहा महिने पूर्ण झाले, मात्र मृत्यू पडलेल्या या दोघांना अजूनही न्याय मिळाला नाही. त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आणि त्या दोघांनाही आदरांजली वाहण्यासाठी तरुणाईने रस्त्यावर उतरून मेणबत्ती घेऊन येत ती पेटवून आदरांजली वाहिली. विशेष म्हणजे, राजकीय धामधूमित राजकीय पक्ष विरहीत ही आदरांजली वाहण्यात आली.
कल्याणीनगर परिसरात १८ मे रोजी मध्यरात्री श्रीमंत अल्पवयीन कारचालक असलेल्या भरधाव आलिशान पोर्शे कारने आयटी इंजिनिअर असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक देऊन त्यांचा जीव घेतला. या घटनेला आज (दि. १८ नोव्हेंबर) सहा महिने पुर्ण होत आहेत. हे प्रकरण पुण्यासाठी आणि पुणे पोलिसांसाठी महत्वाचे ठरले होते.या अपघात प्रकरणात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे हे प्रकरण देशभरात चर्चिले गेले होते. राजकीय हस्तक्षेपातून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी अत्यंत तळमळीने याप्रकरणाचा तपासकरून मुलाचे आई-वडिल, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर व एक कामगार तसेच रक्तबदलात मदत करणारे आणि अशा सर्वांना अटक केली. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे. याघटनेचा तपास सुरू आहे.दरम्यान, याघटनेला ६ महिने पुर्ण होत असल्याने या अपघातात जीव गमावलेल्या अनिश व अश्विनी यांना आदरांजली वाहण्यासाठी तरुणाईने अपघातास्थळी एकत्रित जमत "एक मेणबत्ती पेटवून" त्यांना आदरांजली वाहिली. दोघांचे कुंटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. माणुसकीच्या नात्याने तसेच एक समाज म्हणून तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहूयात, असे मत यावेळी तरूणाईने व्यक्त केले.