टिटवाळा : धूळवड साजरी केल्यानंतर खडवली येथील भातसा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेला भूषण म्हस्के (२५, रा. मुलुंड) बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.खडवलीतील भातसा नदीकिनारी अनेकांनी शुक्रवारी गर्दी केली होती. मुलुंड पश्चिमेतील केशवपाडा येथील आठ तरुणही दुपारी तेथे आले होते. ते नदीपात्रात उतरल्यानंतर भूषणला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडाला. ही घटना दुपारी ३ च्या सुमारास घडली. त्याचे मित्र व इतरांनी शोधाशोध केली. परंतु, तो सापडला नाही. त्यामुळे त्यांनी घटनेची माहिती स्थानिक खडवली पोलिसांना दुपारी चारच्या सुमारास दिली. सहपोलीस निरीक्षक जितेंद्र अहिरराव यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच आपल्या पथकासह घटनास्थळी शोधमोहीम सुरू केली. मात्र, अग्निशमन दलाचे पथक ६ वाजता दाखल झाले.त्यानंतर, अंधार पडल्याने शोधमोहिमेत अडचण निर्माण झाली. भूषणचा शोध लागलेला नाही. शनिवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार असल्याचे अहिरराव यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात भूषण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यातआली आहे.
खडवलीच्या भातसा नदीत तरुण बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 5:48 AM