पुणे : गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहिल्यानंतर प्रेमसंबंधात वाद झाल्याने तो पुण्यात भावाकडे निघून आला. तेव्हा या प्रेयसीने त्याचा पुण्यात येऊन शोध घेतला. परत आपल्याबरोबर राहण्यास बोलावले. त्याने नकार दिला. तेव्हा तिने दोघांच्या मदतीने चक्क त्याचे अपहरण करुन त्याला घेऊन गेली. उत्तमनगर पोलिसांच्या पथकाने थेट गुजरातमध्ये जाऊन या तरुणीसह तिघांना ताब्यात घेऊन या तरुणाची सुटका केली आहे.
दिलीप गोरख पवार (वय २२, रा. कोंढवे धावडे, मुळ रा. कोरवली, तांडा कामठी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा जुळा भाऊ दिनेश गोरख पवार यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद फिर्यादी हे खासगी चालक म्हणून काम करतात. १५ दिवसांपूर्वी त्यांचा जुळा भाऊ दिलीप पवार हा त्यांच्याकडे आला आहे. इतरांबरोबर बिगारी काम करु लागला. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान दिलीप व राजू गोफणे हे काम संपवून एम एस गेटवरुन कोंढवा गेटकडे जात असताना एक गाडी आडवी आली. त्यातील दोघांनी दिलीप पवार याला जबरदस्तीने गाडीत घालून पळवून नेले. ही बाब समजल्यावर फिर्यादी यांनी तातडीने उत्तमनगर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांना घटनास्थळाजवळील एका गॅरेजच्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाल्याचे आढळून आले. त्यांच्या ओळखीची एक तरुणी व इतर दोघे जण दिलीप पवार याला घेऊन जात असल्याचे दिसले.
दिलीप पवार हा मागील ३ ते ४ वर्षांपासून वापीमधील उमरगाव येथे एका तरुणीच्या घरी राहत होता. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु होते. त्यात वाद झाल्याने दिलीप पवार हा तिचे घर सोडून पुण्यात भावाकडे आला होता. दोन दिवसांपूर्वी ही तरुणी कोंढवे धावडे येथे येऊन त्याच्याशी भांडून गेली होती. हा सर्व प्रकार समजल्यावर उत्तमनगर पोलिसांचे पथक वापी येथे गेले. त्यांनी दिलीप पवार याची सुटका केली. तसेच या तरुणीसह तिघांना ताब्यात घेतले. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितले की, पोलीस पथक या तरुणीसह तिघांना घेऊन आज सकाळीच पुण्यात पोहचले आहेत. त्यांच्याकडे सध्या चौकशी सुरु आहे.