पुणे: पुण्यातील 21 वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईचं व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करून एका पुरुषासोबत असणारे प्रेमसंबंध तिने उघडकीस आणले. त्यानंतर आईच्या प्रियकराला ब्लॅकमेल करत त्याच्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी सदर तरुणीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
एका व्यक्तीचे स्वतःच्या आईसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा पर्दाफाश करण्यासाठी 21 वर्षीय तरुणीने आईचे व्हॉट्सअॅप हॅक केले. त्यातून तिने आई आणि तिच्या प्रियकराचे फोटो, व्हिडीओ मिळवले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याचं धमकावत 15 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिथुन मोहन गायकवाड ( वय 29, रा. कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह एक 21 वर्षीय तरुणी आणि एका व्यक्तीवर विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली. फिर्यादीने यासंबंधी तक्रार अर्ज दिला. त्या अर्जाची खातरजमा करण्यात आली.
तक्रारदार व्यक्तीचे एका 40 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या महिलेच्या मुलीला या दोघांवर संशय होता. या दोघांचं प्रेम प्रकरण उघडकीस आणण्यासाठी या मुलीने स्वतःच्या आईचा व्हाट्सअप हॅक केलं. त्यावेळी तिला या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. व्हॉट्सअॅप हे केल्यानंतर तिला काही फोटो आणि व्हिडिओ देखील मिळाले होते. हेच फोटो आणि व्हिडिओ तिने आपल्या प्रियकराला दाखवले. आणि त्यानंतर खंडणीचा प्रकार सुरु झाला.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, पोलीस हवालदार मधुकर तुपसौंदर, संजय भापकर, रवींद्र फुलपगारे, प्रवीण राजपूत, अतुल साठे, मपोहवा हेमा ढेबे, पोलीस नाईक नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, अमोल आव्हाड, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विजय कांबळे, पोलीस शिपाई प्रफुल्ल चव्हाण आणि अमर पवार यांनी ही कारवाई केली.