लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असताना त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते ‘लव्ह इन रिलेशन’मध्ये राहत होते. त्यात दोघांमध्ये झालेल्या भांडणात तिने प्रियकराचा गळा दाबला व त्याला भिंतीवर ढकलले. त्यात जखमी होऊन प्रियकराचा मृत्यू झाला. शवविच्छेदनातून हा प्रकार समोर आला असून हडपसर पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे.
रोहिणी रामदास युनाते (वय २४, रा. हिंद कॉलनी, भेकराईनगर) असे या तरुणीचे नाव आहे. तर सोनल पुरुषोत्तम दाभाडे (वय ३४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोनलचा भाऊ निवास दाभाडे (वय ३०, रा. घोटा, ता. तिवसा, जि. अमरावती) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले की, रोहिणी युनाते ही मूळची बीडची राहणारी असून, दाभाडे हा अमरावतीचा राहणारा होता. दोघेही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना त्यांची ओळख झाली. गेल्या ३ वर्षांपासून ते फुरसुंगीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. दोघेही नोकरी करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये भांडणे होत होती. २७ ऑगस्ट रोजी त्यांच्यात एकमेकांवरील संशयावरून भांडणे झाली. तेव्हा रोहिणीने सोनलचा गळा दाबला व त्याला भिंतीवर ढकलून दिले. त्यात त्याच्या डोक्याला मार लागला. तो तसाच निपचित पडून होता. तसेच त्याला ताप आला असल्याने तो झोपला. दरम्यान, भांडणाच्या रागातून तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी ती उठून निघून गेली. २८ ऑगस्टला तिच्या तब्येत खालावून त्यात त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात गळा दाबल्याने व डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यावरून चौकशी केल्यावर तपासात रोहिणी हिने गळा दाबल्याचे व भिंतीला ढकलल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला आज अटक केली आहे.