पिंपरी: पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उच्चशिक्षित तरुणीचे आयटीआय झालेल्या तरुणाशी प्रेम संबंध जुळले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून गर्भवती राहिल्याने तरुणीला काहीतरी खाण्यास देऊन गर्भस्त्राव घडवून आणला. यात तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात काळेवाडी येथे १२ मार्च २०२१ रोजी ही घटना घडली.
विकास वसंत मोहिते (वय २५, रा. सेनापती कापशी गाव, कोलेवाडी, ता. कागल, जि. कोल्हापूर), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी याने 'आयटीआय'चे शिक्षण घेतलेले आहे. मयत २५ वर्षीय तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २१) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली तरुणी नोकरीच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. त्यावेळी आरोपी विकास मोहिते याच्याशी तिची ओळख झाली. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळून आले. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी गर्भवती राहिली. त्यामुळे आरोपीने तिला काहीतरी खाण्यास देऊन अशास्त्रीय पद्धतीने गर्भस्राव घडवून आणला. यात तरुणीचा मृत्यू झाला. अशास्त्रीय पद्धतीने गर्भस्राव घडवून आणल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपीला अटक केली आहे.