पुणे : गड-किल्ल्यांचा पर्यटनस्थळाप्रमाणे विकास करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतल्यावरही त्याला विरोध सुरूच आहे. त्यातच एका तरुणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा सिंहगड किल्ल्यावरून कडेलोट केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली होती. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी सरकारने तत्वतः मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयावर प्रचंड टीका झाल्याने सरकारने भूमिका बदललेली आहे. त्यानंतरही अनेकांनी या निर्णयाचा निषेध सुरूच ठेवला असून पूजा झोळे हिने प्रतीकात्मक कडेलोट केला आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.मुळची करमाळ्याची असणारी पूजा ही पुण्यामध्ये शिक्षण घेत असून ती गडकिल्ले संवर्धन आणि इतर अनेक सामाजिक विषयांवर फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होते.
या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, 'छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत पराक्रमाने हे किल्ले काबीज केले आहेत. तिथे हॉटेल उभा करण्याच्या निर्णयाबद्दल सरकारने शिवप्रेमींची माफी मागायला हवी. हे किल्ले आमची अस्मिता आहे. या निर्णयाचा निषेध करते. आणि ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूला आणि दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा कडेलोट केला जायचा त्याप्रमाणे आम्ही आपला प्रतिकात्मक कडेलोट करत आहोत.हा फक्त एक डेमो आहे असाही उल्लेख यात करण्यात आला आहे.