पुणे: नगर रस्त्यावरील चंदननगर भागात एका घराचा दरवाजा उघडा असल्याचे दोघांच्या लक्षात आले. तिने भीक मागण्याच्या उद्देशाने अल्पवयीन साथीदाराबरोबर घराची पाहणी केली. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून दोघेही ऐवज चोरून पसार झाले. अखेर देवाची आळंदी परिसरात दोघेही पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांच्याकडून ३५ लाख रुपयांचे ५२ तोळे सोन्याचे दागिने, २६ हजारांची रोकड, साडेपाच लाख रुपयांची मोटार असा एकूण मिळून ४० लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिली दीपक पवार (वय २०, रा. आडगाव नाका, पंचवटी, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. मिली पवार आणि अल्पवयीन साथीदार भीक मागण्याचा बहाणा करायचे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत ते फिरायचे. एखाद्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यास दोघे जण पाहणी करायचे. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून ते आत शिरायचे. काही मिनिटांत ते कपाटातील ऐवज, रोकड चोरी करून पसार व्हायचे. भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात काही दिवसांपूर्वी त्यांनी चोरी केली होती. चंदननगर भागातील घरातून त्यांनी ५२ तोळे सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेली होती.
दागिने चोरून पसार झालेली तरुणी आणि साथीदार देवाची आळंदी परिसरात असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस हवालदार महेश नाणेकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. चौकशीत दोघांनी खडक आणि चंदननगर परिसरात चोरी कबुली दिली. पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने, सहायक निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, प्रफुल्ल मोरे, सचिन पाटील, विकास कदम, अमोल जाधव, शेखर शिंदे, नामदेव गडदरे, सूरज जाधव, श्रीकांत कोद्रे, ज्ञानोबा लहाने, शीतल वानखेडे, पूजा डहाळे, मनीषा पवार यांनी ही कारवाई केली.