पुणे : मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी तसेच त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवर पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
युवराज वामन शिंदे असे आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून, त्याची पत्नी काजल युवराज शिंदे या नवरा-बायको विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामाच्या निमित्ताने पीडित महिलेची युवराज शिंदेशी भेट झाली. त्यानंतर महिलेशी ओळख निर्माण करून तीला विवाहाचे आमिष दाखवून युवराजने पीडितेला सातारा रस्त्यावरील एका हाॅटेलमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून वेळोवेळी महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप देखील पीडित तरुणीने केला आहे. त्यानंतर महिलेने विवाहाबाबत विचारणा करण्यास सुरूवात केल्यावर शिंदेने तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले. हा प्रकार १० जूलै २०२३ ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला.
यानंतर लग्न का करत नाही, असा पीडितेने जाब विचारल्यानंतर शिंदेच्या पत्नीने जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या अंगावर धावून गेली. याप्रकरणी महिलेने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिस ठाण्यात सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर करत आहेत.