पुणे: पुण्यात रिल्सच्या नावाखाली जीवघेणा स्टंट केल्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागलेत. मागील आठवड्यात दुचाकीवरून एक तरुणी हात सोडून चालतावतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावरून तयार करणाऱ्या तरुणांवर टीकाही झाली होती. अशातच पुण्याच्या कात्रज भागातून पुन्हा एकदा जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. एका इमारतीच्या टेरेसवरून तरुणी तरुणाच्या हाताला लटकली आहे. अशा जीवघेण्या प्रकारात तरुणीचा जीव जाण्याची शक्यता व्हिडिओमधून दिसत आहे.
रिल्समधून तरुण हा त्या टेरेसवर झोपला आहे. त्याने त्याचा उजवा हात टेरेसवरून खाली सोडलेला दिसतोय. त्या हाताला तरुणी लटकत आहे. तर दुसरा तरुण शेजारी उभा राहून व्हिडिओ काढतोय. टेरेसवर चारही बाजूने कॅमेरे लावण्यात आल्याचेही रिल्समधून दिसत आहे. हे करत असताना तरुणीचा हात निसटला असता अथवा तरुणाकडून वजन पेलले नसते. तर तरुणी नक्कीच खाली पडली असती. परंतु सुदैवाने अशी काही घटना घडली नाही. परंतु असा जीवघेणा स्टंट करण्यावरून समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
पावसाळयातही अनेक पर्यटन स्थळांवर जीवघेणे स्टंट करताना तरुण तरुणींचे जीव गेले आहेत. तरीही अशा रिल्सचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. पोलिसांकडून अशा तरुण तरुणींवर गुन्हा दाखल करून अटकही केली जाते. तसेच शिक्षाही सुनावली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र असे जीवघेणे रिल्सचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. अशा स्टंटबाबत कठोर कारवाईचे कायदे तयार करावेत अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.