पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) पहिली प्रवेश फेरी जाहीर झाली असून, राज्यात ४० हजार ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट व मेकॅनिक डिझेल या ट्रेडला सर्वाधिक पसंती मिळत आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) राज्यातील सरकारी आणि खासगी मिळून ९७५ आयटीआय आहेत. यामध्ये एक लाख ३५ हजार ७७३ जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
दहावीनंतर झटपट रोजगाराचा मार्ग म्हणून आयटीआयकडे पाहण्यात येते. राज्यात दोन लाख ४८ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे. पहिल्या फेरीत ९२ हजार १४० विद्यार्थ्यांचे ॲलॉटमेंट जाहीर करण्यात आले आहे. त्यापैकी ४० हजार ७१० विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
नव्या प्रवेशांसाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी डीव्हीईटीच्या https://admission.dvet.gov.in/ वेबसाइटवर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारी आयटीआयला सर्वाधिक पसंती
सरकारी आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ४० हजारांपैकी ३१ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी सरकारी आयटीआयमध्ये, तर उर्वरित नऊ हजार २३७ विद्यार्थ्यांनी खासगी आयटीआयमध्ये प्रवेश निश्चित केले आहे.
दुसऱ्या फेरीची यादी ६ ऑगस्टला
दुसऱ्या फेरीची आयटीआयचे पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया बुधवारपर्यंत सुरू होती. आता फेरीसाठी प्रवेश यादी ही शनिवारी (दि.६ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.