प्रसाद कानडे / राजू इनामदार
पुणे : पुणे मेट्रो धावायला लागली आणि पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नव्या साधनाची भर पडली. पुणेकरांचा देखील याला उदंड प्रतिसाद लाभत आहे. मात्र, मेट्रोच्या प्रवासामुळे पुणेकरांच्या वेळेत सध्या तरी तशी बचत होत नाही. उलटपक्षी पाच मिनिटांचा अधिकचा वेळच खर्च करावा लागतो.
शनिवारी ‘लोकमत’ने याची पडताळणी केली. ‘लोकमत’च्या दोन प्रतिनिधींनी एकाच वेळी दुचाकी आणि मेट्रोमधून प्रवास केला. यात दुचाकीला ९ मिनिटे, तर मेट्रोला १४ मिनिटांचा वेळ लागला. शनिवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास आम्ही वेगाची पाहणी केली. शनिवारी व रविवारी तशी पुण्यात रस्त्यावर वाहने कमी असतात. सोमवारी वा अन्य दिवशीचे चित्र वेगळे असते. त्यामुळे या निष्कर्षात वारानुरूप बदल होऊ शकतो. शनिवारी जे निरीक्षण केले, ते येथे मांडले.
शनिवारी दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी गरवारे स्थानकापासून दुचाकी व मेट्रोच्या प्रवासास सुरुवात झाली. दुचाकीला रस्ते मार्गात सात सिग्नल लागले. तर मेट्रोच्या मार्गात तीन स्थानके लागली. या प्रत्येक स्थानकावर मेट्रोने २ ते ३ मिनिटाचा थांबा घेतला. दुचाकींचा वेग ताशी ४० किमी होता. मेट्रोचा वेगदेखील ताशी ४० किमी इतका होता. मेट्रोच्या मार्गात अन्य वाहने नसताना देखील मेट्रोला उशीर लागला.
दुचाकीला लागलेला वेळ
गरवारे स्थानक : ४ वाजून १५ मिनिटे सुरुवात, मार्गात सात सिग्नल पैकी ४ सिग्नलवर दुचाकी थांबली. ३ सिग्नल क्लियर होते, त्यामुळे थांबावे लागले नाही. दुचाकीला वनाजला पोहोचण्यास ४ वाजून २४ मिनिटे लागले.
मेट्रोला लागलेला वेळ
गरवारे स्थानक ४ वाजून १५ मि. सुरुवातनळ स्टॉप ४ वाजून १७ मी पोहोचले. (३ मिनिटांचा थांबा )नळ स्टॉपहून धावण्यास सुरुवात : ४ वाजून २० मिनिटेआयडियल कॉलनी : ४ वाजून २२ मिनिटांनी पोहोचले.२ मिनिटांचा थांबा घेऊन ४ वाजून २४ मिनिटांनी सुरुवात.४ वाजून २५ मिनिटांनी आनंद नगर स्थानकांवर पोहोचले. (दोन मिनिटांचा थांबा )४ वाजून २७ मिनिटांनी सुरू.४ वाजून २९ मिनिटांनी वनाज स्थानकावर मेट्रो पोहोचली.