पुणे :पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये मिळून आतापर्यंत ३५ हजार ५५६ डाेळे आलेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक २३ हजार ८०९ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तर आतापर्यंत ३५ हजारांपैकी १५ हजार रुग्ण बरे झाले असून आणखी २० हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जुलैच्या शेवटी डाेळे येण्याच्या साथीची सुरुवात पुणे ग्रामीण भागातील आळंदीपासून सुरू झाली. तेथे एकाच दिवसांत तीन ते चार हजार रुग्णसंख्या दिसून आली. तेव्हापासून याची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. यानंतर या साथीचा प्रसार झपाट्याने पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्येही वाढत आहे. ही संख्या आता ३५ हजारांवर गेली आहे. मात्र, हा आकडा कित्येक पटीने माेठा असण्याची शक्यता आहे. कारण ही आकडेवारी केवळ सरकारी दवाखान्यातील आहे.
रुग्णसंख्या वाढायला लागल्यावर पुणे महापालिकेच्या आराेग्य विभागाने शाळांमध्ये जात मुलांच्या डाेळ्यांची तपासणी करायला सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत ४५ हजार मुलांच्या डाेळ्यांची तपासणी केली असून त्यापैकी १,३५२ मुलांना संसर्ग असल्याचे निदान झाले. तसेच महापालिकेच्या दवाखान्यांतील बाह्यरुग्ण विभागात आतापर्यंत ४,५८३ रुग्णांचे निदान झाले. अशा प्रकारे एकूण सहा हजार रुग्ण पुणे शहरात आढळले आहेत. तसेच ग्रामीण भागात २३ हजार ८०६ आणि पिंपरी चिंचवडमध्ये ५ हजार ६१२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी काही रुग्ण हे दवाखान्यातील तर काही सर्वेक्षण करताना आढळून आलेले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आराेग्य विभागाने दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील डाेळ्यांच्या रुग्णांची संख्या
विभाग - रुग्णसंख्या - बरे झालेले
पुणे शहर - ५९३५ - १५०८
पिंपरी चिंचवड - ५६१२ - २५५७
पुणे ग्रामीण - २३८०९ - ११०८३