शिवानी खोरगडे
पुणे : राज्यसहित पुण्यातही गरमीने अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. नागरिकांना प्रवासात उन्हाचे चटके बसू लागलेत. डोक्यावर सूर्याची तीक्ष्ण किरणं, रस्त्यावरून जाताना जाणवणारी उष्णता, या सगळ्यात कोरडा पडलेला घसा यामुळे थंडगार पाण्यासाठी जीव त्रासला आहे. अशातच एका रिक्षाचालकाने नवी शक्कल लढवली आहे. चक्क रिक्षामध्ये छोटेखानी लायब्ररी, प्रथमोपचार पेटी, पिण्याकरता मोफत पाणी, कचरापेटी, अग्निरोधक अशा सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. सिंहगड रस्त्याला राहणाऱ्या केशव गणबोटे असं या रिक्षाचालकाचे नाव आहे.
केशव यांना त्यांच्या ऑटोतून प्रवास न करता पायी चालत जाणाऱ्यांचेही काही अनुभव आले आहेत. ऑटोतून प्रवास करायचा नाहीये मात्र वाटेत कोणाला तहान लागली असेल तर पाण्याचा जार आणि ऑटोवर लिहिलेलं पाणी सेवा वाचून कोणी हात दाखवला तरी केशव ऑटो थांबवतात. लोकही जेव्हा केशव यांच्याशी बोलतात तेव्हा त्यांच्याशीही आपुलकीनं बोलून त्यांना मोफत पाणी सेवा देतात.
रिक्षात बसल्यावर हे सर्व पाहून मनालाही प्रसन्न वाटू लागते. या ऑटोमधील सर्व सुखसुविधा पाहून उतरवण्याची इच्छाही होत नाही. रिक्षात बसल्यावर अनेक जण मोबाईल काढून बसतात, पण या रिक्षात असणारी पुस्तके, वर्तमानपत्रे पाहून मोबाईल हातात घेण्याची इच्छाही होत नसल्याचे अनेक प्रवाशांनी त्यांना सांगितले.
केशव गणबोटे म्हणाले, उन्हातान्हात अनेक नागरिक तहानलेले असतात. ते माझ्या रिक्षातील पाण्याचा ड्रम पाहून रिक्षाला थांबवतात. आवर्जून पाणी मागतात. नागरिकांनी पाणी प्यायल्यावर मिळालेले आशीर्वाद माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. तुमच्या मुळे माझी तहान भागली असं कोणी म्हटल्यावर खूपच आनंद होतो. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच रिक्षाचे कौतुक करत असतात. लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मन भारावून जाते. प्रत्येकाचे अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून मी जातं करून ठेवले आहेत. प्रथमोपचार पेटीही लोकांना विशेष वाटू लागली आहे. त्यामध्ये मी जास्त प्रमाणात बेसिक औषधे ठेवली आहेत. लोंकाना चक्कर येणे, दुखणे, कणकण, ताप, सर्दी, खोकला यावरची औषधे या प्रथमोचार पेटीत ठेवली आहेत.
ज्यूसपेक्षा तुमच्या पाण्याने आमची तहान भागवली एका मंदिरातून देवाचे दर्शन झाल्यावर दोन व्यक्ती बाहेर आल्या. त्यांनी रस्त्यावर माझी रिक्षा पहिली. त्यावेळी लांबूनच त्यांना रिक्षात पाणी असल्याचे दिसले. ते स्वतःहून जवळ आले. आणि आम्हाला पाणी मिळेल का? अशी विचारणा केली. मी त्यांना तातडीने पाण्याचे ग्लास भरून दिले. ते म्हणाले कि, आज आमचा उपवास आहे. सकाळपासुन दोन - तीन वेळा ज्यूस प्यायलो. ज्यूस प्यायल्यावर जेवढं बर वाटलं नाही. तेवढी तहान तुमच्या पाण्याने भागवली. असा पुण्याईचा आशीर्वाद केशव यांना मिळल्याचे त्यांनी सांगितले.
आईने मुलीला पाणी पाजण्यासाठी थांबवली रिक्षा
मी रिक्षाने जाताना असंख्य प्रवासी कुठंतरी जाण्यासाठी रिक्षा थांबवतात. पण एका महिलेने माझ्या रिक्षावरील पाटी पाण्याचा ड्रम पाहून रिक्षा थांबवली. त्या म्हणाल्या, माझ्या मुलीला तहान लागली आहे. मला फक्त पाणी मिळू शकेल का? त्यावेळी मी कुठलाही विचार न करता त्यांना आणि त्यांच्या मुलीला पाणी दिले. त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून फारच बरं वाटले. असेही केशव यांनी सांगितले.