चाकण (पुणे) :चाकण औद्योगिक वसाहतीमधील महाळुंगे इंगळे गावातील एका १८ वर्षीय तरुणाचे (दि. १६ ) अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण करण्यात काही जुन्या आरोपींचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावातील भांगरेवस्ती येथून आदित्य युवराज भांगरे (वय-१८ वर्षे) यास काही अनोळखी व्यक्तींनी घराजवळून अपहरण केल्याची फिर्याद यांच्या आईने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अपहरण करण्यात आलेल्या मुलाचे महाळुंगे गावातील शंभू भोसले या मुलासोबत मैत्री होती. शंभू भोसले व त्याच्या साथीदारांनी गावातील रितेश संजय पवार याचा खून काही महिन्यापूर्वी केला होता. मृत रितेश पवार याचा भाऊ राहुल संजय पवार हा शंभू भोसले व त्याच्या मित्रांना सोडणार नाही त्यांचा बदला घेणार असे म्हणत होता. रितेशच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आदित्यचे अपहरण करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणात एका संशयित आरोपीस चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून खरपुडी गावच्या हद्दीत एकाचा खून करून त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार आणि रासे फाट्याजवळील हॉटेलात एकावर गोळीबार केला, असं आरोपींनी सांगितले आहे. मात्र त्यात तस्थ नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अपहरण केलेला आदित्याचा शोध अजूनही लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. महाळुंगे इंगळे गावातील जुने आरोपी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक(गुन्हे) संतोष कसबे हे करत आहेत.