पुणे : उसने घेतलेले पैसे वसुलीसाठी काही गुंडांनी हडपसर येथून तरुणाचे अपहरण करुन त्याला कारमधून घेऊन जात होते. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा मागोवा घेऊन अवघ्या ४ तासात या तरुणाची सुटका करुन सोलापूरच्या पाच गुंडाना जेरबंद केले. दीपक मोहन ताकतोडे (वय ३२), छगन विठ्ठल जगदाळे (वय ३३), भगवान दत्तु शिंदे (वय ४८), विशाल नानासाहेब सावंत(वय २५), विजय सिध्देश्वर शितोळे (वय २७, सर्व रा. ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी, आतिक तांबोळी (वय ३०) हा पूर्वी सोलापूर येथे रहात होता. त्यावेळी त्याने छगन जगदाळे याच्याकडून २० हजार रुपये उसने घेतले होते. त्यातील १५ हजार रुपये त्यांनी परत केले होते. तरीही जगदाळे १ लाख रुपयांची मागणी करीत होते. रविवारी सकाळी ते व त्याचा साडु यासीन शेख हे लग्नाला चालले होते. त्यावेळी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते शेवाळवाडी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले. त्यावेळी कारमधून आलेल्यांनी आतिक तांबोळी यांचे जबरदस्तीने अपहरण केले. यासीन याने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविली. त्याबरोबर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तांबोळी यांच्या मोबाईलचा लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते नाना पेठेत आढळून आले. अपहरणकर्त्यांची गाडी नाना पेठेत पोलिसांना सापडली. पोलिसांनी गाडीतील पाच जणांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हडपसर पोलिसांनी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोंम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, हवालदार प्रमोद टिळेकर, महेश वाघमारे, दया शेगर, रमेश साबळे, पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे, स्वाती गावडे यांच्या पथकाने केली आहे.
भगवान शिंदे याच्यावर २०१० मध्ये खूनाच्या प्रकरणात शिक्षा झाली होती. कोरोना संसर्गामुळे त्याची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. पॅरोलवर सुटला होता.दीपक ताकतोडे, विशाल सावंत यांच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.