पुणे : संविधानाच्या प्रसार आणि प्रचारासाठी आता तरुणाई पुढे आली आहे. एस. एम. जाेशी साेशलिस्ट फाॅउंडेशन आणि संविधान संवर्धन समितीतर्फे दाेन दिवसीय राज्यस्तरीय संविधान बचाव कार्यशाळेचे आयाेजन केले आहे. या कार्यशाळेत राज्यातील विविध भागातून 68 युवक-युवती सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेचे उद्घाटन आज एस. एम. जाेशी साेशलिस्ट फाउंडेशनचे काेषाध्यक्ष अभय जाेशी आणि संविधानाचे अभ्यासक सुरेश सावंत यांच्या हस्ते झाले.
संविधानाचा प्रचार करण्यासाठी संविधान प्रचारक तयार करणे, सामान्य नागरिकांपर्यंत भारतीय संविधान पोहचवणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. आज पहिल्या दिवशी संविधानाच्या निर्मितीचा इतिहास आणि संवैधानिक मूल्य याविषयी संविधानाचे अभ्यासक सुरेश सावंत यांनी मांडणी केली. दैनंदिन जीवनातील भारतीय संविधानाचे महत्व याविषयी सुरेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाच्या नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत त्याचबरोबर मूलभूत कर्तव्ये या बाबतीत राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते व संविधानाचे अभ्यासक श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी मार्गदर्शन केले.
उद्या जनआंदोलने आणि भारतीय संविधान याविषयी ऍड असीम सरोदे हे मांडणी करणार आहेत. तसेच दैनंदिन प्रश्न व भारतीय संविधानातील उत्तरे यावर प्रा. सुभाष वारे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या समारोपास प्रा. अंजली मायदेव उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यशाळेत छात्र भारती,अनुभव शिक्षा केंद्र, रिपब्लिकन युथ फोर्स,लोकमुद्रा संस्था संघटना सहभागी आहेत. फाउंडेशनचे राहुल भोसले, नागेश जाधव, संदीप आखाडे, कार्तिका आडे, निलेश खानविलकर, शिरीष वाघमारे, मयुर डुमणे, स्वप्नील मानव यांनी कार्यशाळेच्या आयोजनात सहभाग घेतला.