धायरी: मौजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणास सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ८० हजार रूपये किंमतीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. महेश ऊर्फ मायकल नवनाथ कांबळे (वय २५ वर्ष, थिटे वस्ती, बैंक ऑफ बडोदाच्या पाठिमागे, खराडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचोराचे नांव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीस प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यासाठी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पेट्रोलिंग करुन संशयित वाहनांची तपासणी करीत असताना तपास पथकातील कर्मचारी शंकर कुंभार व उज्ज्वल मोकाशी यांना मिळालेल्या बातमीवरुन सराईत वाहनचोर महेश कांबळे यांस नवले पुलाजवळ दुचाकीसह पकडुन चौकशी केली असता त्याच्या जवळची दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यास ताब्यात घेवून अधिक तपास केला असता तो सराईत वाहनचोर असल्याचे निष्पन्न झाले. त्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५ दुचाकी, लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ दुचाकी व तोफखाना पोलीस ठाणे, अहमदनगर हद्दीतील १ दुचाकी अशा तब्बल ७ दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीवर चंदननगर पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल असून तो सराईत वाहनचोर आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्यासह पोलीस कर्मचारी मोहन भुरुक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुंभार,उजवल मोकाशी, सचिन माळवे, दयानंद तेलंगे पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अविनाश कोंडे, राहुल शेडगे, धनाजी धोत्रे, निलेश कुलथे, किशोर शिंदे, रफिक नदाफ, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.