पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या श्वेतांग निकाळजे याने ठेवण्यासाठी दिलेले पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपयांचे एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ऋषिकेश सुनील गायकवाड (वय २१, रा़ कसबा पेठ) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील ऋषिकेश गायकवाड हा शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात येणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस कर्चमारी नरेश बलसाने व ज्ञानेश्वर देवकर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शिवाजीनगर येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर श्वेतांग निकाळजे याने अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. त्यावेळी तो त्याच्यासोबत पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथे राहिला असल्याचे सांगितले. तसेच त्याची झडती घेतल्यावर त्याच्या जिन्स पॅन्टच्या खिशात एक गावठी बनावटीचे ३० हजार रुपयांचे पिस्तूल मिळून आले. या पिस्तूलाबाबत विचारणा केल्यावर श्वेतांग निकाळजे याने त्याला हे पिस्तूल ठेवण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. सराईत गुन्हेगार निकाळजे हा अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेल्यानंतर तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती़. तेव्हा पुणे शहरांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला होता़ . श्वेतांग निकाळजे याला पोलिसांनी भोर येथून पकडून अल्पवयीन मुलीची सुटका केली होती़. परंतु, तेव्हापासून ऋषिकेश गायकवाड हा फरार होता़. ही कारवाई पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनिषा झेंडे, कर्मचारी नरेश बलसाने, ज्ञानेश्वर देवकर, राजेंद्र कचरे, कविता नलावडे यांच्या पथकाने केली.
गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 9:00 PM
जीन्स पॅन्टच्या खिशात एक गावठी बनावटीचे ३० हजार रुपयांचे पिस्तूल मिळून आले. या पिस्तूलाबाबत विचारणा केल्यावर श्वेतांग निकाळजे याने त्याला हे पिस्तूल ठेवण्यासाठी दिले असल्याचे सांगितले.
ठळक मुद्देसराईत गुन्हेगार श्वेतांग निकाळजेने दिले होते पिस्तुल