पुणे : सुपर पॉवर अंगात आल्यास आपल्याला हवे करता येते. अनेकांना धडा शिकवता येतो. इतरांच्या मदतीला धावून जाता येते. सर्वसामान्य व्यक्तीला जे सहजासहजी शक्य होत नाही ते सुपर पावरच्या व्यक्तींना साध्य होते. ही भावना तरुणाईमध्ये सर्वाधिक प्रबळ असून चित्रपट यशस्वी होण्यामागील ते प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्याच्या जोडीला त्या चित्रपटाचे तितक्याच ताकदीने करण्यात आलेले प्रभावी मार्केटींग चित्रपटाचा ‘युएसपी’ ठरत आहे.
सध्या लोकसभा निवडणूकीचा काळ असूनही शुक्रवारी (दि. २६) प्रदर्शित झालेल्या ‘अँव्हेजर : द एंड गेम’ने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शहरातील जवळपास सर्वच चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे ‘शो’ सुरु आहेत. डोळ्यासमोर निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती त्यांच्या मोबाईलवर सोशल माध्यमाव्दारे प्रसिध्द करण्यात येत होती. दर्जेदार आशयाला उत्कृष्ठ तंत्रज्ञानाची जोड देऊ न प्रेक्षकाला भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणा-या अँव्हेंजर्स चित्रपट मालिकेला ‘टार्गेट युथ’ हे मार्केटींग तंत्र यशस्वी जमले आहे. याविषयी अधिक माहिती देताना चित्रपट अभ्यासक अशोक राणे म्हणाले, ‘‘प्रेक्षकांना सतत नवीन काही हवे असते. रटाळ विषयाच्या चित्रपटांना ते लवकर कंटाळतात. मुळातच अँव्हेंजर हा टेक्नोसँव्ही प्रकारचा चित्रपट आहे. सध्याच्या पिढीचे तंत्रज्ञानाशी वाढती जवळीक पाहता त्यांना याप्रकारचे चित्रपट पाहायला आवडतात. चित्रपटांत वापरण्यात आलेली अल्ट्रा मॉडेल टेक्नोलॉजी प्रभावी आहे. मात्र याबरोबरच चित्रपटाच्या प्रसिध्दी करीता वापरण्यात आलेली मार्केटींग स्टँटर्जी महत्वाची आहे. याशिवाय ‘‘शेवटचा भाग, आता पुन्हा नाही’’ अशा प्रकारे प्रेक्षकाला करण्यात आलेले भावनिक आवाहन तरुणाईचा पसंतीस पडत आहे. याप्रकारचे चित्रपट बघणारा प्रेक्षक पूर्णत: वेगळा आहे. तंत्रज्ञान हे या चित्रपटाचे ’अँस्थँटिक्स’ आहे.’’
सुपरहिरो ही संकल्पनाच तरुण पिढीला प्रिय असते. आपण करु शकत नसलेलं सारं हे करु शकतात. पण अव्हेंजरची लोकप्रियता तेवढ्यापुरती मर्यादित नाही. मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स मधून मार्वलने गेल्या अकरा वर्षात बावीस चित्रपट दिले आहेत. या सगळ्यांमधून मिळून त्यांनी एक गुंतागुंतीची मोठी कथा पुढे नेली जी अँव्हेंजर्स या सुपरहिरोंच्या संघटनेची आणि त्यातल्या प्रत्येक नायक व नायकीची आहे. यातल्या अनेकांवर स्वतंत्र चित्रपट केले गेले आणि ही सर्व पात्र एकत्रित असलेले चित्रपटही आले. केवळ व्हिजुअल इफेक्ट्सवर यांचा भर नाही. अॅवेंजर्स एन्डगेम हा या मालिकेतला महत्वाच्या टप्प्यावरला चित्रपट असून तो गेल्या वर्षी आलेल्या इन्फिनिटी वॉरच्या पुढचा भाग आहे. रुसो बंधूंनी दिग्दर्शित केलेले हे दोन चित्रपट मिळून एक कथानक असल्यासारखं आहे. गेली दहा अकरा वर्ष ज्या नायकांचा आपण पाठपुरावा करतो त्यांचं भवितव्य या भागात उलगडत असल्यामुळे त्यांना गर्दी झाली यात आश्चर्य नाही. - गणेश मतकरी (चित्रपट अभ्यासक)
भावनिकदृष्या गुंतवणूक करण्यास देखील अँव्हेंजर्स यशस्वी ठरला आहे. २००८ ला या मालिकेतला पहिला चित्रपट आला. तेव्हा शाळा कॉलेजात असलेला प्रेक्षक त्यात गुंतला आणि पुढे या चित्रपटांबरोबर लहानाचा मोठा झाला. एन्ड गेम मध्ये या व्यक्तिरेखा त्यांच्या आजवरच्या प्रवासाला अर्थपूर्ण अखेर देतात. तरी एक आहे की प्रेक्षकाला आधीचे चित्रपट माहीत नसले तर नुसता एन्ड गेम, किंवा इन्फिनिटी वॉर आणि एन्ड गेम पाहून उपयोग नाही. तुम्हाला भावनिक परिणाम अनुभवायचा असेल तर त्यांच्या आजवरच्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार असणं आवश्यक असल्याचे मतकरी यांनी म्हटले आहे.