सांगली : येथील राममंदिर चौकातील ‘बेल्झ केक शॉप’मध्ये पन्नास हजाराची रोकड चोरी केल्याचा पश्चाताप झाल्याने शुभम नामदेव व्हनखंडे (वय १८, रा. हरिपूर रस्ता, पाटणे प्लॉट, सांगली) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवार दि. ७ नोव्हेंबरला ही घटना घडली. घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.
शुभम व्हनखंडे हा बेल्झ केक शॉपमध्ये कामाला होता. ३१ आॅक्टोबरला मध्यरात्री चोरट्यांनी केक शॉपी फोडून पन्नास हजाराची रोकड व सीटीटीव्ही कॅमेरा लंपास केला होता. शॉपचे मालक अनुप गांधी यांनी १ नोव्हेंबरला विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. बुधवारी पोलिसांनी शॉपमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरु ठेवली होती. यावेळी शुभमचीही चौकशी झाली होती. त्याला पुन्हा गुरुवारी चौकशीसाठी बोलाविले होते. तेव्हापासून तो तणावाखाली होता. घरी गेल्यानंतर त्याने, शॉपमध्ये ‘मीच चोरी केली आहे’, असे सांगितले. हे ऐकून घरच्यांना धक्का बसला. घरचे लोक शॉपचे मालक गांधी यांना भेटून, त्यांची माफी मागण्यासाठी व पैसे परत करतो, हे सांगण्यासाठी गेले. त्यावेळी शुभमने राहत्या घरी साडीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घरचे लोक गांधी यांना भेटून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याने आत्महत्या केल्याचे पाहून संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला.मालकाची माफीआत्महत्या करण्यापूर्वी शुभमने मालक गांधी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून, ‘दुकानात मीच चोरी केली आहे’, अशी कबुली दिली. तसेच ‘मला पैशाची खूप अडचण होती, यासाठी मी दुकानातील पन्नास हजाराची रोकड लंपास केली आहे, मला माफ करा’, अशी विनंतीही त्याने केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीतही असाच मजकूर आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.