पुणे : गावाकडच्या घरासाठी वडिलांनी ८५ लाखांचे कर्ज काढले. ते न फेडल्याने सहकर्जदार मुलाचे खाते बँकेने सील केले. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने अडचणीत आलेल्या तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी मुलाचे आईवडील, भावावर गुन्हा दाखल केला आहे.
अभिजित मच्छिंद्र कदम (वय ३८, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी दिपाली अभिजित कदम (वय ३८) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचा दीप अनिकेत मच्छिंद्र कदम (वय ३१), सासु कुसुम मच्छिंद्र कदम (वय ५६) आणि सासरे मच्छिंद्र नामदेव कमद (वय ६२) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती अभिजित कदम यांचा प्रेमविवाहाला सासरकडील लोकांचा विरोध होता. अभिजित कदम यांची कृष्णा साई सर्व्हिस ही कंपनी होती. तिच्या मार्फत आळंदी नगरपालिकेचा ठेका घेतला होता. कंपनीचे पैसे फिर्यादीचे सासरे घेत. गावाकडील घरासाठी त्यांनी ८५ लाखांचे कर्ज काढले. त्याला अभिजित सहकर्जदार होते. त्यांनी कर्ज न भरल्याने बँकेने त्या कर्जाचे हप्ते अभिजित यांच्या खात्यातून वळते करुन घेतले. त्यामुळे त्याने नेमलेल्या कामगारांचे पगार थकले. त्यांचा पॉव्हिडंट फंड व अन्य बाबीसाठी पैसे कमी पडत होते. त्यांनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याने नगरपालिकेने त्यांना नोटीस बजावली होती.
वडील, भावाकडे त्यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे अभिजित आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे त्याने या सर्व बाबी सुसाईट नोटमध्ये लिहून १८ मे २०२३ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या या सुसाईट नोटमध्ये खाडाखोड असल्याने पोलिसांनी ती तपासणीसाठी हस्ताक्षरतज्ञांकडे पाठविली होती. त्यांच्या अहवालानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.