पुणे : कथित पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने २८ वर्षे वयाच्या तरुणास शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन फ्लॅटसाठी ४०- ५० हजार रुपये घेऊनही आणखी पैसे घेऊन ये म्हणून त्रास दिला. त्यामुळे सदर तरुणाने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन येथे घडली आहे.
गणेश बाळासाहेब जगताप (वय २८, रा. मोटार स्टँड, गणेश मंगल कार्यालयासमोर, उरुळी कांचन, ता. हवेली) याने आत्महत्या केली आहे. त्याचे वडील बाळासाहेब मारुती जगताप (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोनाली व तिचा मित्र भीमा गोरे (दोघांचेही पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांचे विरोधात पैशाची मागणी करून आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बाळासाहेब जगताप यांना गणेश व अक्षय अशी दोन मुले असून, अक्षय हा विवाहित असून, सैन्यदलात नोकरी करतो. गणेश हा मत्स्यविक्रीचा व्यवसाय करतो. व्यवसायातून त्याला चांगली कमाई होते. सुमारे अडीच वर्षांपूर्वी तो सोनाली नावाचे मुलीला घरी घेऊन आला व त्याने आई - वडिलांना ही माझी मैत्रीण असून मला तिचेशी लग्न करावयाचे आहे असे सांगितले. तिच्या आई वडिलांशी गाठ घालून दे मग लग्नाचे पाहू असे सांगितले असता त्याने तिला कोणीही नाही, ती अनाथ आहे असे सांगितले. त्याने तिचे पूर्ण नाव व पत्ता सांगितला नाही. तिला ५ दिवस घरात ठेवले. त्यानंतर त्याने तिला हडपसर येथे घेऊन गेला. तेथे एका खोलीत ते राहू लागले.
६ मे रोजी त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. पोलीस आल्यानंतर त्याला खाली घेण्यात आले. पोलिसांनी त्याची तपासणी केली त्यांना पॅन्टच्या खिशात दोन चिठ्ठ्या मिळून आल्या. त्यात माझ्या बायकोला माझे प्रेम समजले नाही. ते दोघे माझ्या मृत्यूस कारणीभूत आहेत. त्यांना सोडू नका, असे लिहिले आहे.