बारामती : येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. वर्षाला दहा कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन देणारे पंतप्रधान आज बेरोजगारीबाबत चकार शब्द काढत नाहीत, असे यावेळी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.
बारामती येथील गुणवडी चौकात काँग्रेस कार्यालयाच्या आवारामध्ये शुक्रवारी (दि. १७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त बेरोजगारीच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. यावेळी शहराध्यक्ष अशोक इंदुले म्हणाले की, भारताच्या जनतेला सोनेरी स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने खऱ्या अर्थाने जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवादाची कारणे पुढे करून नोटबंदी केली. त्यामुळे भारताला आर्थिक महामंदीचा सामना करावा लागत आहे. कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. लघु, मध्यम उद्योग बंद पडले. आज करोडो लोक रोजगारासाठी वणवण फिरत आहेत. उच्चशिक्षित तरुण चहा, भजीची स्टॉल लावून आपली उपजीविका करत आहेत. म्हणूनच मोदी सरकारला जागे करण्यासाठी मोदींचा जन्म दिवस हा राष्ट्रीय पातळीवर बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज बारामती युवक काँग्रेसतर्फे बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी ॲड. आकाश मोरे, युवक जिल्हा सरचिटणीस वीरधवल गाडे, युवक अध्यक्ष वैभव बुरुंगले तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते विपुल तावरे, ॲड. शंतनू माळशिकारे, सिद्धेश गवळी उपस्थित होते.
----
फोटो ओळी : बारामती शहरातील गुणवडी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला.
१७०९२०२१-बारामती-२४
---