युवक काँग्रेसची जनआक्रोश पदयात्रा अडवली; कार्यकर्त्यांचा रोष, पायी जाऊन विधानसभेला घालणार होते घेराव
By राजू इनामदार | Updated: March 15, 2025 20:05 IST2025-03-15T20:05:20+5:302025-03-15T20:05:43+5:30
परवानगी नाकारायची होती तर आम्ही तीनचार दिवसांपूर्वी मागितली, त्याचवेळी नकार द्यायचा होता, आता परवानगी नाकारणे याला हुकुमशाही म्हणतात

युवक काँग्रेसची जनआक्रोश पदयात्रा अडवली; कार्यकर्त्यांचा रोष, पायी जाऊन विधानसभेला घालणार होते घेराव
पुणे: युवक काँग्रेसची जनआक्रोश यात्रा सुरू होताच पोलिसांनी पाषणकर गॅरेज चौकात अडवली. परवानगी नाकारली असल्याचे कारण यासाठी देण्यात आले. कार्यकर्ते पायी मुंबईपर्यंत जाऊन १९ मार्चला विधानसभेला घेराव घालणार होते. आम्ही आमचा निर्धार नक्की पाळू, घेराव घालणारच असे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन यांनी सांगितले.
लाल महाल ते विधानसभा अशा ५ दिवसांच्या पदयात्रेचे नियोजन करण्यात आले होते. त्याची सुरूवात शनिवारपासून होणार होती. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी लाल महालाजवळ दुपारी चार वाजेपर्यंत जमा झाले. राज्याच्या विविध भागांमधून यात्रेसाठी कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते. पदयात्रेत काही पदाधिकारी कायम राहणार होते व मुंबईपर्यंतच्या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी त्यात युवक काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी सहभागी होणार होते.
त्याप्रमाणे लाल महालापासून पदयात्रा सुरू झाली. युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, अध्यक्ष कुणाल राऊत, कार्याध्यक्ष शिवराज मोरे, सह प्रभारी एहसान खान, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, बंटी शेळके, सोनललक्ष्मी घाग, प्रशांत ओगले, श्रीनिवास नालमवार, वैष्णवी किराड, अजित सिंह, विजय चौधरी, ऋत्विक धनवट, अमोल दौंडकर, सौरभ आमराले, महेश टावरे,चंद्रशेखर जाधव, उमेश पवार, कौस्तुभ नवले व अनेक कार्यकर्ते यात सहभागी होते. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मात्र तिथे पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना काहीच सांगितले नाही. यात्रा शिवाजीनगर बसस्थानकाच्या अलिकडील चौकापर्यंत आल्यानंतर तिथेच अडवण्यात आली. तुम्हाला परवानगी नाकारण्यात आली आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे पुढे जाता येणार नाही असे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे तेही चकित झाले. यात्रा थांबवण्यास त्यांनी नकार दिला.
त्यानंतर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आले. तिथेच त्यांना बसवून ठेवण्यात आले. यात्रेला परवानगी नाही इतकेच त्यांना सांगण्यात येत होते. प्रदेश सरचिटणीस जैन यांनी सांगितले की ही पोलिसांची हुकुमशाहीच आहे. आम्ही पायी जाणार आहोत, कोणत्याही हिंसक घोषणा देणार नाहीत, आमच्याकडून कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल असे काहीही होणार नाही असे आम्ही त्यांना सांगत होते, मात्र परवानगी नाही इतकेच ते आम्हाला सांगत होते.
परवानगी नाकारायची होती तर आम्ही तीनचार दिवसांपूर्वी मागितली. त्याचवेळी नकार द्यायचा होता, आता पदयात्रेत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते तयारी करून आले असताना परवानगी नाकारणे याला हुकुमशाही नाही तर दुसरे काय म्हणणार असा प्रश्न जैन यांनी केला. आमची पदयात्रा आम्ही पूर्ण करणारच, ती शांततेत आहे, १९ मार्चला ठरल्याप्रमाणे आम्ही विधानसभेला घेराव घालूच असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.