लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे- युवक काँग्रेसने प्रवक्ता नियुक्तीसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्हा, राज्य तसेच देशस्तरावरही युवक काँग्रेस याच पद्धतीने प्रवक्ते पदावर नियुक्त्या करणार आहे. ‘यंग इंडिया के बोल’ असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व महाराष्ट्राचे प्रभारी संजीव शुक्ल यांनी काँग्रेस भवनमधील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहराध्यक्ष विशाल मलके व अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. शुक्ल म्हणाले, युवकांमधील टॅलेंटला व्यासपीठ मिळावे, यासाठी अशी स्पर्धा आयोजिली आहे. गुगल संकेतस्थळावर स्पर्धकांना यासाठीचे अर्ज उपलब्ध होतील. त्यातील माहिती लिहून ते सबमिट करायचे आहेत. त्यानंतर स्पर्धकांना स्पर्धेचे ठिकाण, वेळ, दिनांक कळवले जाईल. त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. अर्ज दाखल करण्यासाठी १ ऑक्टोबर ही अखेरची मुदत आहे. बेरोजगारी, महागाई, नोटाबंदी अशा विषयांचा अंतर्भाव यात आहे. काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे विचार वक्त्याने मांडणे यात अपेक्षित आहे. जिल्हास्तरावर पाच विजेते काढले जातील. ते युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते म्हणून काम करतील. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधील प्रत्येकी ५ विजेत्यांनी राज्यस्तरावर स्पर्धा होईल. त्यातील ५ विजेते राज्य प्रवक्ते म्हणून काम करतील. देशाच्या प्रत्येक राज्यातील अशा प्रत्येकी ५ विजेत्यांनी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होऊन त्यातील ५ विजेत्यांना राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून जाहीर केले जाईल, असे शुक्ल यांनी सांगितले.