नीरा : पिंपरे खुर्द (ता.पुरंदर) येथे कालव्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बडून मृत्यू झाला, ओंकार संजिवन गायकवाड (वय २५) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. तो बुडल्याचे कळताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आवर्तन थांबविण्याचे सांगण्यात आले. मात्र, आवर्तन थांबविण्यात आले नाही. रात्रभर शोधमोहीम सुरू होती. सकाळी सातच्या सुमारास पुण-पंढरपुर पालखी मार्गावरील पुलाला लावलेल्या जाळीमध्ये त्याचा मृतदेह सापडला. रविवारी गायकवाड हा त्याच्यो मित्रांसह नीरा डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. तो काही वेळाने दिसून न आल्याने सहकारी मित्रांनी आरडाओरडा करत त्याची शोधाशोध केली. मात्र, तो सापडला नाही यामुळे नीरा पाटबंधारे विभाग कालव्याचे आवर्तन थांबवण्यास सांगितले. मात्र, त्यांनी असमर्थता दर्शविली. कामा धंद्या निमित्ताने गावाबाहेरील लोक लॉकडाऊन मुळे सध्या गावाकडे आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने पिंपरे (खुर्द) नारळीचा मळा येथील युवक पोहण्यासाठी नीरा डावा कालव्यात दुपारी दोनच्या सुमारास गेले होते. युवक पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत होते. अचानक ओंकार दिसुन न आल्याने युवकांनी शोधाशोध सुरू केली. त्याचे कपडे, चप्पला आदी साहित्य कालव्याच्या काठावर असल्याने तो याच परिसरात असण्याची शक्यता असल्याने युवकांनी शोधमोहीम सुरू केली. गावातील तरबेज पोहणा-यांनी ही शोध मोहीमेत सहभाग घेतला होता. ओंकार यांच्या पश्चात आजी, आई वडील, डॉ.भाऊ असा परिवार आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गावीच त्यांच्यावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुरंदर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी संजिवन गायकवाड यांचे ते कनिष्ठ चिरंजीव होत.
पुरंदर तालुक्यात कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 9:09 PM
रविवारी युवक हा मित्रांसह नीरा डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता.
ठळक मुद्देपिंपरे खुर्द येथील घटना : तक्रार करूनही थांबले नाही आवर्तन