पुणे : परभणीवरुन मामाकडे पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या चौदा वर्षांच्या मुलाचा दुचाकीवरून जाताना पीएमपीएल बसने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की, त्यात मुलाच्या डोक्यावरून पीएमपीएलचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. सोलापूर रोड वरील शेवाळवाडी फाटा येथे ही घटना घडली. अजय नामदेव राठोड (वय १४, रा. फुरसुंगी ता. हवेली) असे अपघातीमृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्याचा मामा अनिल आडे (रा. फुरसुंगी, ता. हवेली) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपीएल चालक मेहबुब अकबर सैय्यद (वय ३८, रा. वडगाव-रसाई ता. हवेली) याला अटक केली आहे.अजय हा परभणी येथून त्याचा मामा अनिल आडे यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आला होता. तो सध्या बेकराईनगर येथील शाळेत इयत्ता सातवीत शिकत होता. बुधवारी (दि. ३१) रोजी अजय हा मामा अनिल यांच्या दुचाकीवरून लोणी येथून हडपसरच्या दिशेने येत असताना सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी फाट्याच्या पुढे जय भवानी ट्रेडर्स अॅण्ड हार्ड वेअर जवळ सैय्यद चालवत असलेल्या पीएमपीएल बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये अजय हा रस्त्यावर उजव्या बाजूला तर अनिल हे डाव्या बाजूला पडले. मागून घाईने निघालेल्या बसच्या मागच्या चाकाखाली अजय आला. त्याच्या डोक्यावरूनच पीएमपीएलचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. दुचाकीवर प्रवास करित असताना दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. गुन्ह्याचा तपास हडपसर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षा बांबे करित आहेत.
पीएमपीच्या धडकेत शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 6:36 PM